मोठी बातमी! मतमोजणीचा संभ्रम दूर; सर्व ठिकाणचा निकाल २१ डिसेंबरला एकत्रच जाहीर होणार, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. यासोबतच २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहिल आणि तोपर्यंत एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यासही बंदी असणार आहे.
मोठी बातमी! मतमोजणीचा संभ्रम दूर; सर्व ठिकाणचा निकाल २१ डिसेंबरला एकत्रच जाहीर होणार, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Published on

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मतमोजणीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. यासोबतच २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहिल, असेही कोर्टाने स्पष्ट केले असून तोपर्यंत एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यासही बंदी असणार आहे.

सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आयोगाने तेथे २० डिसेंबररोजी मतदान आणि २१ डिसेंबरला निकाल असा नवीन आदेश दिला होता. तर, उर्वरीत सर्व ठिकाणी आज मतदान होत आहे. त्यामुळे दोन्ही टप्प्यातील मतमोजणी कधी होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता उद्याची मतमोजणी रद्द करण्यात आली आहे. तसेच, २१ डिसेंबरलाच सर्व ठिकाणचा निकाल जाहीर करण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने दिला आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आज (२ डिसेंबर) २६४ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडत असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी मतदानाची वेळ आहे. यासाठी १२ हजार ३१६ मतदान केंद्रांवर ६२ हजार १०८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे.

कुठल्या निवडणुका पुढे ढकलल्या?

ज्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये बारामती, फलटण, महाबळेश्वर, अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी, मंगळवेढा, तळेगाव, लोणावळा, मुखेड, धर्माबाद, भोकर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, अंजनगाव सुर्जी, गोंदिया, घुग्गुस, गडचांदूर आदी प्रमुख नगरपालिकांचा समावेश आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणांची निवडणूक स्थगित केली आहे त्या ठिकाणावरील निवडणूक घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नव्याने सुधारित कार्यक्रम यापूर्वीच जाहीर केला आहे. आयोगाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. स्थगित केलेल्या पालिकांसाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी ४ डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करतील. त्यानुसार १० डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत उमेदवारांना स्थगित जागेवर अर्ज दाखल करता येतील. तर, ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप करून पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करावी लागेल. त्यानंतर २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल, तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in