महायुतीत जागांचा घोळ; भाजपमध्ये अस्वस्थता, इच्छुकांचे दावे सुरूच
विशेष प्रतिनिधी/मुंबई
लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, निवडणुकीच्या हालचालींना जसा वेग येत आहे, तसा जागा वाटपाचा गुंता वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातल्या त्यात महायुतीतील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता अधिक आहे. कारण महायुतीतील मित्रपक्षांच्या अनेक जागांवर भाजपचे नेते दावा ठोकायला लागले आहेत. आधीच रायगडवरून वाद सुरू झाला होता. सोबतच कोल्हापूर, हातकणंगले, शिरूर, छ. संभाजीनगर आणि हिंगोलीतही भाजपने मोर्चेबांधणी केली असून, या जागांवर भाजपचे नेते दावा करू लागले आहेत. दरम्यान, जिथे शिवसेनेच्या जागा, तेथे आमचा दावा असल्याचे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महायुतीत मित्रपक्षांतील वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.
राज्यात सध्या १८ जागा शिवसेनेकडे आहेत. मात्र, शिवसेनेत फूट पडल्याने १३ खासदार शिंदे गटासोबत गेले आहेत, तर ५ खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. तब्बल १३ खासदार महायुतीसोबत गेले आहेत. मात्र, यापैकी बऱ्याच जागांवर भाजपचे स्थानिक नेते दावा करीत आहेत. भाजपच्या नेत्यांचीही शिवसेनेच्या बऱ्याच जागांवर नजर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागावाटपात खूप कसरत करावी लागणार आहे. एकीकडे भाजपने दिलेला प्रस्तावावर त्यांना विचार करावा लागेल आणि दुसरीकडे तडजोड करताना आपल्याच विद्यमान खासदारांची नाराजीही ओढावून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जागावाटपाच्या वेळी चांगलीच कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्या १९ जागा आहेत, त्या जागांवर दावा केला आहे. तसा प्रस्तावही भाजपकडे दिला गेल्याचे समजते. परंतु शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपचा डोळा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरून दावे सुरू झाले आहेत. यामध्ये रामटेक, कोल्हापूर, हातकणंगलेच्या जागांसोबतच शिरूर, मावळ मतदारसंघावरही दावा केला जात आहे. यात शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला, तर मावळवर भाजप दावा करीत आहे. याशिवाय आता छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीच्या जागांवरही भाजपने दावा केला आहे. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांना मैदानात उतरविण्याचा विचार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी तशी तयारीही केल्याचे समजते. परंतु आता याच जागेवर भागवत कराड दावा सांगत असल्याने छत्रपती संभाजीनगरमधील जागेचा वादही उफाळून येऊ शकतो. तसेच आता हिंगोलीतही वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. कारण हिंगोलीत शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार आहेत. याही जागेवर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे एक तर यातील काही जागा भाजपला सोडाव्या लागू शकतात किंवा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते. त्यामुळे शिंदे गटाची अडचण होण्याची शक्यता आहे.
रायगडमध्ये राष्ट्रवादीवर दबाव
रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. मात्र, या ठिकाणी भाजपने दावा केला आहे. या जागेवरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमधील वादही चव्हाट्यावर आला आहे. महायुतीतील हा अंतर्गत वादाचा परिणाम निवडणुकीवर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजप नेते काय तोडगा काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. दुसरीकडे माढ्यात तर भाजपच्या दोन गटांत जागेवरून वाद आहे. एकीकडे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर दुसऱ्यांदा लढण्यास इच्छुक आहेत, तर याच जागेवर भाजपच्याच मोहिते-पाटील घराण्याने दावा केला आहे. त्यामुळे माढ्याचा तिढाही भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे.