

मुंबई : राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलैपासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, तर नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.
वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत ‘एचएसआरपी’ बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
१ जुलैपासून विशेष तपासणी मोहीम
ज्या वाहनधारकांनी ‘एचएसआरपी’ बसवून घेतले नाही किंवा अपॉइंटमेंट नोंदवली नाही, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.