राज्यातील मॉल्सचे होणार फायर ऑडिट; दिली ९० दिवसांची मुदत

मॉल्समध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने आगीच्या घटना घडत असल्याचे प्रकरण गुरुवारी विधान परिषदेत चांगलेच गाजले. या घटना रोखण्यासाठी राज्यातील महापालिकांमधील मॉल्सचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली असून सुरक्षा निकष पूर्ण न करणाऱ्या मॉल्सची वीज व पाणी जोडणी तोडण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिला.
राज्यातील मॉल्सचे होणार फायर ऑडिट; दिली ९० दिवसांची मुदत
Published on

मुंबई : मॉल्समध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने आगीच्या घटना घडत असल्याचे प्रकरण गुरुवारी विधान परिषदेत चांगलेच गाजले. या घटना रोखण्यासाठी राज्यातील महापालिकांमधील मॉल्सचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली असून सुरक्षा निकष पूर्ण न करणाऱ्या मॉल्सची वीज व पाणी जोडणी तोडण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिला.

मॉल्समधील अनियमितता आणि आगीच्या घटना वाढल्याबाबत आमदार कृपाल तुमाने यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मुंबईतील मॉलला लागलेल्या आगीनंतर ७५ मॉलच्या अग्निसुरक्षा तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी २६ मॉल्सना नोटीस देण्यात आली होती. केवळ नोटीस देऊन उपयोग नाही, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.

नियम धाब्यावर बसविणाऱ्यांचे पाणी-वीज तोडणार

मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेने यापूर्वीच सर्व मॉल्सचे फायर ऑडिट केले आहे. ७५ मॉलपैकी ५ ते ६ मॉलवर कडक कारवाई करण्यात आली असून नोटीस दिलेले उर्वरित मॉल बंद आहेत. मात्र यापुढे मॉलमधील अग्निसुरक्षा संदर्भात कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकांना मॉल्सच्या अग्निसुरक्षा तपासण्यासंदर्भात आदेश आताच देण्यात येतील. यामध्ये सुरक्षा निकष पूर्ण न करणाऱ्या मॉल्सची वीज व पाणी जोडणी तोडण्यात येईल, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in