प्रतिनिधी/मुंबई
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता याच आठवड्याच्या अखेरपर्यंत कधीही लागू शकते. या पार्श्वभूमीवर सोमवार आणि मंगळवारी राज्यमंत्रीमंडळाच्या सलग दोन बैठका होण्याची शक्यता आहे.
या बैठकांत लोकप्रिय निर्णयांचा धडाका लागू शकतो. आमदारांच्या मतदारसंघातील मंजूर झालेल्या विकासकामांबाबतचे जीआर काढण्याची देखील लगबग सुरू आहे. केवळ दोन दिवसांत २६९ जीआर काढण्यात आले आहेत. तसेच महायुती आणि महाआघाडी यांच्या जागावाटपाच्या चर्चा देखील आता अंतिम टप्प्यात आल्याने त्यांच्याही उमेदवार याद्या घोषित होऊ शकतात. त्यामुळे येता आठवडा हा राजकीय दृष्ट्या धावपळीचाच असणार आहे.
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता आता काही दिवसांतच घोषित होऊ शकते. येत्या आठवडयाच्या अखेरपर्यंत तिची घोषणा होईल, असेच संकेत मिळत आहेत. त्यामुळेच सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस राज्यमंत्रीमंडळ बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. मागील आठवडयातील केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा आणि राज्यातील नेत्यांना लोकसभा जागावाटपाच्या चर्चेसाठी करावी लागलेली दिल्लीवारी आदी कारणांमुळे राज्यमंत्रीमंडळ बैठक घेता आलेली नाही. यामुळे आता सलग दोन दिवस राज्यमंत्रीमंडळ बैठक घेऊन लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाका उडवून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर विविध लोकोपयोगी प्रकल्पांच्या उदघाटनांसाठी अनेक ठिकाणी दौऱ्यावर जात आहेत. शनिवारी त्यांनी सातारा-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा दौरा केला, तर रविवारी ते कोल्हापूर-हिंगोली-ठाणे जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन कळ दाबून करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
मंत्रालयात कामांसाठी गर्दी वाढली
आमदारांच्या मतदारसंघातील विकासनिधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांचे जीआर काढण्याची देखील लगबग सुरू आहे. कारण जोपर्यंत जीआर निघत नाही तोपर्यंत निधी वितरित होऊ शकत नाही. दोन दिवसांत तब्बल २६९ जीआर काढण्यात आले आहेत. मंत्रालयात देखील विविध कामांसाठी गर्दी वाढली आहे. अभ्यागतांसाठी असणारी लाईन मोठी झाली आहे. येता आठवडा देखील मंत्रालयात गर्दीचा आठवडा असणार आहे.