­सरकारची रिक्षा-टॅक्सीचालकांना मुदत देण्याची तयारी; परिवहन अधिकाऱ्यांसोबत आज बैठक - सरनाईक

राज्यातील परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सीचालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी जुजबी मराठी आलीच पाहिजे.
सरकारची रिक्षा-टॅक्सीचालकांना मुदत देण्याची तयारी; परिवहन अधिकाऱ्यांसोबत आज बैठक - सरनाईक
सरकारची रिक्षा-टॅक्सीचालकांना मुदत देण्याची तयारी; परिवहन अधिकाऱ्यांसोबत आज बैठक - सरनाईक (Photo-X/@PratapSarnaik)
Published on

मुंबई : राज्यातील परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सीचालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी जुजबी मराठी आलीच पाहिजे. ती शिकण्यासाठी मुदत देण्याची तयारी आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्रात राहून रिक्षा-टॅक्सीचा व्यवसाय करणार. पण मराठी शिकणारच नाही, ही मुजोरी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

येत्या महाराष्ट्र दिनापासून अमराठी वाहनचालकांची मराठी भाषेची चाचणी घेण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. या विषयावर आज, मंगळवारी परिवहन अधिकाऱ्यांची बैठक होणार असून या बैठकीत मराठी सक्तीचा १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.

अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयाला रिक्षा-टॅक्सी चालकांच्या संघटनेने विरोध करत येत्या ४ मे रोजी सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी सोमवारी मंत्रालयातील दालनात रिक्षा-टॅक्सी संघटनेचे नेते, प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत मराठी सक्तीसाठी तीन महिने ते एक वर्ष मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

मराठी सक्तीच्या अंमलबजावणीला मुदत मागण्यात आली असली तरी मी शब्द दिलेला नाही. मंगळवारी बैठक बोलावली आहे. चालकांना शिकवणी पाहिजे असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. मुदत द्यायला तयार आहोत, पण मुजोरी चालणार नाही. किती मुदत द्यायची, हे ठरवावे लागेल, असे सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठीसाठी जागता पहारा द्या - राज ठाकरे

मुंबई : मराठीसाठी जागता पहारा द्या. ४ मे रोजी बळजबरीने रिक्षा बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवा आणि स्वेच्छेने रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांच्या ठाम पाठीशी उभे रहा, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांना दिले.

या निर्णयाला विरोध करणाऱ्या संजय निरूपम यांचा गेल्याच आठवड्यात मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला होता. याच आंदोनकर्त्यांनी सोमवारी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई बंद करण्याची ताकद आहे काय?

मनसे नेते अमित ठाकरे यांनीही मराठीच्या मुद्दयावर परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा दिला आहे. मराठी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. ज्यांना मराठी बोलायचे नाही, त्यांनी आपापल्या शहरांत निघून जावे. तुम्ही संपावर ठाम असाल तर आम्ही आमच्या भाषेवर ठाम आहोत. सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्यांचेच लोक त्यांना विरोध करतात. त्यामुळे मुंबई कोण बंद करणार? परप्रांतीय रिक्षाचालकांची मुंबई बंद करण्याची ताकद आहे का? असे सवाल अमित ठाकरे यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in