

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल २ लाख ५६ हजार १३७ कोटींची गुंतवणूक असलेल्या १८ विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास बुधवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे राज्यात सुमारे १ लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल, मॉड्युल, इग्नॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश आणि संरक्षण साहित्य, लिथियम आयन बॅटरी, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती/साहित्य, स्टील आणि गॅस टू केमिकल निर्मितीचे विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यासाठीच्या १८ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
कोकण, विदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक विकासाला चालना
या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. त्याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार आहे.
विशेष प्रोत्साहन मिळालेले उद्योग आणि त्यांची गुंतवणूक
रायगड/ पालघर : ग्रीन स्टील प्रकल्प - ११ हजार कोटी
बालासोर अलॉयज - १७ हजार ४७९ कोटी
ॲकमे क्लीनटेक प्रा.लि. - ३७ हजार ८०० कोटी
एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि. - ५६ हजार ८५२ कोटी
नाशिक : व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. कंपनी - ८०० कोटी
छत्रपती संभाजीनगर : नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस - एक हजार कोटी
गोदावरी न्यु एनर्जी प्रा. लि. - २७ हजार ५१५ कोटी
पुणे : जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. - १ हजार ५०० कोटी
युरोबस इंडिया प्रा. लि. - ४ हजार २०० कोटी
गडचिरोली : हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि. ३ हजार १३५ कोटी
रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. - ४० हजार कोटी
अहिल्यानगर : निबे स्पेस - ४ कोटी
भंडारा : अशोक लेलँड लि. - १० हजार कोटी
नागपूर : ॲकमे क्लीनटेक सोल्युशन प्रा.लि. - ११ हजार ४०० कोटी
सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लि. - १२ हजार ७८० कोटी.