सुट्या दूध विक्रीवरील बंदी उठवा; राज्यातील दूध विक्रेत्यांची FDA कडे मागणी

सुट्या दुधाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा अन्न व औषध प्रशासनाने पुनर्विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्रातील किरकोळ दूध विक्रेत्यांनी शुक्रवारी केले. या निर्णयामुळे डेअरी व्यवसायाशी संबंधित असलेल्या सुमारे १५ लाख लोकांच्या उपजीविकेला धोका निर्माण होईल, असा दावा विक्रेत्यांनी केला आहे.
सुट्या दूध विक्रीवरील बंदी उठवा; राज्यातील दूध विक्रेत्यांची FDA कडे मागणी
सुट्या दूध विक्रीवरील बंदी उठवा; राज्यातील दूध विक्रेत्यांची FDA कडे मागणी
Published on

मुंबई : सुट्या दुधाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा अन्न व औषध प्रशासनाने पुनर्विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्रातील किरकोळ दूध विक्रेत्यांनी शुक्रवारी केले. या निर्णयामुळे डेअरी व्यवसायाशी संबंधित असलेल्या सुमारे १५ लाख लोकांच्या उपजीविकेला धोका निर्माण होईल, असा दावा विक्रेत्यांनी केला आहे.

शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘एफडीए’ मुख्यालयाला भेट देऊन आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंढे उपलब्ध नसल्याने शिष्टमंडळाने एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपले निवेदन सुपूर्द केले.

दुधातील भेसळ रोखण्यासाठी आणि अन्न सुरक्षितता बळकट करण्यासाठी एफडीएने नुकताच संपूर्ण राज्यात सुटे आणि किरकोळ दूध विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ३ ते १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असून परवाना रद्द करण्याचीही तरतूद आहे. याशिवाय, कच्चे दूध वाहून नेणाऱ्या कंटेनरवर कच्चे दूध आणि पिण्यापूर्वी उकळणे आवश्यक अशी लेबले ठळकपणे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

एफडीए अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, गोठ्यातून थेट पुरवले जाणारे ताजे दूध वितरणापूर्वी पॅक केलेले असल्यास सकाळी १० वाजेपर्यंत विकता येईल, असे आश्वासन प्रशासनाने शिष्टमंडळाला दिले आहे. नवीन पॅकेजिंग नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी विक्रेत्यांनी पुरेसा वेळ मागितला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईत सुमारे ५० हजार डेअरी आहेत ज्या निवासी इमारती, गृहनिर्माण सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन दूध पुरवतात. मुंबईच्या दैनंदिन दुधाच्या गरजेपैकी सुमारे १० टक्के गरज गोठ्यातून मिळणाऱ्या ताज्या दुधाद्वारे पूर्ण केली जाते, तर उर्वरित मागणी टँकरद्वारे वाहतूक आणि साठवणूक केल्या जाणाऱ्या पाश्चराइज्ड दुधाद्वारे पूर्ण होते, असे निरुपम म्हणाले.

मुंबईत दररोज सुमारे ५० लाख लिटर दुधाचा खप होतो, तर मुंबई महानगर प्रदेशात दैनंदिन खप सुमारे ६० लाख लिटर आहे. यावरून शहराच्या दूध वितरण नेटवर्कचे महत्त्व अधोरेखित होते.

ताज्या कच्च्या दुधाला ग्राहकांची पसंती

डेअरीमधून थेट पुरवल्या जाणाऱ्या ताज्या कच्च्या दुधाला ग्राहकांची पसंती असते, असा युक्तिवाद विक्रेत्यांनी केला असून नवीन निर्बंधांमुळे सध्याच्या पुरवठा साखळीत विस्कळीतपणा येईल, असे म्हटले आहे. तसेच पाश्चराइज्ड दूध सध्या सुमारे ६८ रुपये प्रति लिटर दराने विकले जाते, तर गोठ्यातील ताजे कच्चे दूध अंदाजे ९८ रुपये प्रति लिटर आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in