चंद्रकांत पाटलांची अपक्ष खासदार विशाल पाटील यांना खुली ऑफर

भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची जाहीर ऑफर दिली आहे.
अपक्ष खासदार विशाल पाटील
अपक्ष खासदार विशाल पाटील
Published on

मुंबई : भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची जाहीर ऑफर दिली आहे. विशाल पाटील आमच्यासोबत आल्यास केंद्रातील आमची संख्या वाढेल आणि सांगलीच्या विकासालाही गती मिळेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपल्यानंतरही राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या पक्ष बदलण्याचा सिलसिला सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत शिवधनुष्य हाती घेतले. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करणारे सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे.

‘राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावे लागते पुढे काय होईल माहीत नाही, वर्तमानकाळात त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्षे दोन महिने आहेत. या कालावधीचा आम्ही विचार करतो’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातील संख्या वाढेल. सोबतच त्यांना सांगली जिल्ह्यात जी विकासकामे करायची आहेत, ती करणे सोपे जाईल. म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर पुन्हा एकदा देत आहोत, त्याचा त्यांनी विचार करावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

...म्हणजे मी चांगले काम करतोय - विशाल पाटील

‘मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतोय, ही चंद्रकांतदादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल. मला सतत भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगले काम करतोय असे मी समजतो’, अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिली आहे. मात्र, भाजप प्रवेशाबाबत माझा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही. पक्ष, गट-तट बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करणे हेच माझे धोरण आहे, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in