रस्ता सुरक्षेसाठी कठोर पावले; एसटीसाठी कोल्ड स्टोरेज, प्रवाशांसाठी बंदिस्त निवारे; मंत्री सरनाईकांच्या बैठकीत अनेक निर्णय

मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा निधीबाबत, ऑटो-रिक्षा व मिटर्स टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात उपाययोजना करणे, मोटार वाहन विभागातील ऑनलाइन बदली धोरण आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाहिरात धोरणाबाबत बैठक झाली.
रस्ता सुरक्षेसाठी कठोर पावले; एसटीसाठी कोल्ड स्टोरेज, प्रवाशांसाठी बंदिस्त निवारे; मंत्री सरनाईकांच्या बैठकीत अनेक निर्णय
Published on

मुंबई : रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवत रस्ता सुरक्षेची जनजागृती करण्यासाठी ब्रँड ॲम्बेसिडरची नियुक्ती करण्यात यावी. तसेच एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी कोल्ड स्टोरेजसारखे प्रकल्प राबवा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले. दरम्यान, रस्ता सुरक्षा निधीतून प्राधान्याने घेण्यात येणाऱ्या कामांसह निधी वापराबाबत नियमावली तयार करावी, असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात सोमवारी (दि.५) रस्ता सुरक्षा निधीबाबत, ऑटो-रिक्षा व मिटर्स टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात उपाययोजना करणे, मोटार वाहन विभागातील ऑनलाइन बदली धोरण आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाहिरात धोरणाबाबत बैठक झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, एसटी महामंडळाचे अधिकारी देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. याबरोबरच रस्त्यावर झेब्रा क्रॉससह आवश्यक मार्किंग चिन्हे करण्यात यावीत. एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी जाहिरात धोरणाचा मसुदा तयार करावा. जाहिरात व पार्सल सेवेतून एसटी महामंडळास अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे याचे नियोजन करावे. प्रवाशांना ऊन, वारा, पावसाचा त्रास होऊ नये म्हणून या पुढील काळात नवीन एसटी निवारे बांधताना ते बंदिस्त पद्धतीचे बांधावेत तसेच एसटी निवारे पीपीपी तत्त्वावर करण्याबाबतचा अभ्यास करण्यात यावा.

सर्व मीटर रिक्षांना इंडिकेटर लावण्याच्या सूचना परिवहन प्राधिकरणाला दिल्या जातील. तसेच बाइक टॅक्सीमधून रोजगार निर्माण होणार असल्याने या योजनेमध्ये काही सुधारणांबाबत आवश्यक मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.

ऑनलाइन बदली धोरणाची माहिती घ्या !

मोटार वाहन विभागात राबविण्यात येणारे ऑनलाइन बदली धोरण सर्वसमावेशक असावे. राज्य शासनाच्या अन्य विभागात ऑनलाइन बदली धोरण कशा प्रकारे राबवले जाते याची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in