

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून 'महायुती' विरुद्ध 'महाविकास आघाडी' (मविआ) असा थेट सामना रंगला आहे. बंडखोरी मोडून काढण्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, अर्ज छाननी आणि नाट्यमय घडामोडींमुळे ६ महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे पारडे जड झाले असून, येथे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या संपत असली, तरी त्यापूर्वीच सोलापूर, यवतमाळ, अमरावती आणि नाशिकमधील चित्र स्पष्ट झाले आहे. तर कोकणामध्ये महायुतीतील बंडखोर उमेदवार जुईली दळवींनी माघार घेतली आहे.
दळवींच्या कन्येचा अर्ज मागे
महायुतीचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचाही तटकरेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध होता. मुख्यमंत्री शिंदेंच्या मध्यस्थीने वाद मिटला आहे. हा अंतर्गत वाद विकोपाला जात असल्याचे पाहून सुनील तटकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि स्थानिक पातळीवरील नाराजी दूर करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा विरोध मावळला. विशेष म्हणजे, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड दौरा होता आणि त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर उतरण्यापूर्वीच जुईली दळवी यांच्या वतीने त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला.
सोलापूरात 'मविआ'चा मुख्य उमेदवारच बाद
सोलापूरमध्ये महायुतीने राजेंद्र राऊत यांना मैदानात उतरवले आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर रिंगणात होते. मात्र, अर्ज छाननीच्या प्रक्रियेत फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरला आहे. यामुळे 'मविआ'ला मोठा धक्का बसला असून आता त्यांना इतर कोणालातरी पाठिंबा द्यावा लागणार आहे. सोलापूरमधील ६१४ मतदारांपैकी महायुतीकडे तब्बल ४२८ मते आहेत, तर मविआकडे केवळ ८१ मते आहेत. त्यामुळे राजेंद्र राऊत यांचा विजय अतिशय सोपा झाला आहे.
संख्याबळाअभावी 'मविआ'च्या उमेदवाराची माघार
यवतमाळमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला, कारण त्यांचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला. पुरसे संख्याबळ पाठीशी नसल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.