अंतिम आठवड्यात मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले; परिषदेची निवडणूक ट्रेलर, पिक्चर विधानसभा निवडणुकीत बघा; विरोधकांना टोला

पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात विरोधकांनी महायुतीवर केलेल्या आरोपाची चिरफाड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलेच बरसले.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे संग्रहित फोटो
Published on

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात विरोधकांनी महायुतीवर केलेल्या आरोपाची चिरफाड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलेच बरसले. परिषदेचे महायुतीला यश मिळाले तो ट्रेलर असून विधान सभा निवडणुकीत पिक्चर बघायला मिळेल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, दोन वर्षांत महायुतीने केलेल्या कामाचे फलक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखांवर झळकले, याचा अर्थ महायुतीचे काम योग्य असून, त्याचा प्रचार केला जातोय, याचे समाधान आहे, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले.

पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या दोन वर्षांत केलेल्या कामाची पोलखोल करत जनतेची फसवणूक केली, असा आरोप केला. महायुतीने दोन वर्षांत केलेल्या कामाचा नव्हे, तर केलेल्या पापाचा पाढा वाचण्याचा अंतिम आठवडा आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. पुढील दोन महिन्यांत विधान सभा निवडणुका पार पडणार असून जाता जाता महायुतीला लाडक्या बहिणींची आठवण झाली, अशी टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

महायुती सरकारला मणीपूरमधील बिघडलेले वातावरण शांत करता आले, पण युक्रेन येथे युद्ध थांबवण्यासाठी वेळ वाया घालवला, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

विरोधकांना दिले उत्तर

अंतिम आठवडा हा निश्चय निर्धाराचा आहे. दोन वर्षांत लोक कल्याण योजना राबवल्या आणि विकासाला गती दिली. शेतकऱ्यांना काय दिले असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला असता त्याला उत्तर देत शिंदे म्हणाले शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, ७.५० हासॅ पाॅवरचे पंप लावणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १४ जागांवर विजय कसा मिळाला, असा प्रश्न पटोले यांना सतावत आहे. खोटे नरेटिव्ह पसरवत विजय मिळाला पण विधानसभेच्या निवडणुकीत फेक नरेटिव्ह चालणार नाही, असा चिमटा शिंदे यांनी पटोले यांना काढला.

'जब तक सुरज चाँद रहेगा तब तक संविधान आणि रहेगा' अशी जोरदार घोषणा करत शिंदे विरोधकांच्या आरोपांची चिरफाड केली. जलयुक्त शिवार योजना, बुलेट ट्रेन अशा विविध प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम विरोधकांनी सत्तेत असताना केले; मात्र महायुतीचे सरकार आल्यावर प्रकल्पांना चालना दिली, महायुतीने कर्ज काढले हे खरं आहे, पण हे कर्ज गोरगरीब जनतेच्या योजना पूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी कर्ज घेतले, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट करत विरोधकांवर बरसले.

शेतकऱ्यांसाठीच्या डीबीटी योजनेत मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा - नाना पटोले

शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, कीटकनाशक आणि नॅनो युरिया देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या योजनेत सुधारणा करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नसताना त्यात बदल केले गेले. कृषी आयुक्तांनी त्याला विरोध केला असता त्या कृषी आयुक्ताचीच बदली करण्यात आली. या डीबीटी योजनेतून मुख्यमंत्र्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप करत सरकारने या घोटाळ्यावर १५ दिवसांत उत्तर द्यावे, अशी मागणी विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in