मुंबई : यंदा वरुणराजाचे वेळेआधीच आगमन झाले आणि ऐन मे महिन्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जून महिना पाऊस गाजवणार, हा हवामान खात्याचा अंदाज फोल ठरताना दिसत आहे. मान्सूनची गती मंदावली असून पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याने आता १० जूनपर्यंत पावसाचा ब्रेक राहणार आहे. २४ ते २७ मेपर्यंत धुवांधार बरसणाऱ्या पावसाला ब्रेक लागल्याने मुंबईकरांना पुन्हा एकदा उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
वातावरणीय बदलामुळे पाऊसही लहरी झाला आहे. यंदा २४ मे रोजीच केरळात मान्सूनचे आगमन झाले आणि २६ मे रोजी मुंबईसह महाराष्ट्रात वरुणराजाची धुवांधार एंट्री झाली. मात्र, वातावरणीय बदलामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे.
यामुळे या काळात केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही तुरळक भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ३५ ते ४० अंश असेल, असा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषी विभागाचे आवाहन
पावसाने पाठ फिरवल्याने कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.