

मुंबई : राज्यातील ‘एसटी’च्या ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी गोड होणार आहे. एसटी महामंडळाने प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी हे निर्णय जाहीर केले. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, असेही ते म्हणाले.
सानुग्रह अनुदान औदार्य नसून त्यांचा हक्क
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणारे निर्णय घोषित केले. “एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे कर्तव्य आहे,” असे सरनाईक यांनी सांगितले.
‘वीज’ कर्मचाऱ्यांना २० हजारांचा बोनस
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही दिवाळी भेट मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीसह महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांमधील सुमारे ८६ हजार कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर विद्युत सहाय्यकांना १४ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.