

मुंबई/पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळाचा परिणाम ओसरला असून, राज्यात आता हुडहुडी भरविणारी थंडी पुन्हा परतली आहे. मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून, सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. पालघर, नवी मुंबई, ठाणे येथे रात्रीच्या वेळी चांगलाच गारठा जाणवत असून मुंबईतही पारा घसरणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस तापमानातील ही घट कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाने अंदाजात म्हटले आहे.
थंडीच्या लाटेचा इशारा
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आज (दि.२) थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून, ती मंगळवारीदेखील कायम राहणार आहे. या जिल्ह्यातील अनेक शहरात थंडीचा प्रभाव वाढला असून, ९ ते १० अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान आले आहे.
बंगालच्या उपसागरातील दितवाह वादळाची तीव्रता कमी होऊन सोमवारी त्याचे न्यून दाबात रूपांतर झाले आहे. हे क्षेत्र उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र किनारपट्टीला समांतर समुद्रातच उत्तरेच्या दिशेने प्रवास करत आहे. याची तीव्रता पुढे आणखी कमी होणार आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेल्या दोन वादळांमुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता उत्तरी वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा प्रभाव वाढला आहे.
मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील अनेक भागाचा किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहचला आहे. बोचरे थंड वारे सायंकाळी आणि पहाटेच्या सुमारास जाणवत असून, दिवसादेखील गारवा जाणवत आहे. किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील २४ तास वातावरण स्थिर राहील. त्यानंतरच्या चार दिवसांमध्ये थंडीचा जोर २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वायव्य भारतात थंडीची लाट
पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या भागात सोमवारी थंडीची लाट पसरली होती. हरियाणातील हिस्सार मध्ये मैदानी भागातील सर्वात कमी ३.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. जम्मू, काश्मीर, लडाख च्य भागात ६ अंश सेल्सिअस च्या खाली किमान तापमान पोहचले आहे, तर दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात ६ ते १० अंश सेल्सिअसच्य दरम्यान किमान तापमान नोंदविले गेले. दरम्यान, पुढील काही दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश या राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.