Maharashtra Municipal Corporation Elections : अर्ज प्रक्रिया सुरू; आघाड्या अनिश्चितच!

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. असे असले तरी सत्ताधारी व विरोधी गटांमधील आघाड्या अद्याप ठोस न ठरल्याने राजकीय वातावरण अनिश्चित बनले आहे.
अर्ज प्रक्रिया सुरू; आघाड्या अनिश्चितच!
अर्ज प्रक्रिया सुरू; आघाड्या अनिश्चितच!
Published on

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. असे असले तरी सत्ताधारी व विरोधी गटांमधील आघाड्या अद्याप ठोस न ठरल्याने राजकीय वातावरण अनिश्चित बनले आहे.

भाजपप्रणीत महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप व उमेदवार निश्चितीसाठी बैठक सुरू असून, विश्वासाचा अभाव आणि निवडणुकीची अपरिहार्यता यामुळे समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत.

कार्यालयीन कामकाजाच्‍या वेळेत २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण ४ हजार १६५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्‍यात आले आहे. पहिल्‍या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही. राज्‍य निवडणूक आयोगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची अधिसूचना १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्‍यानुसार, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.

महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, उमेदवारी अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांची छाननी, निवडणूक खर्च आणि निवडणुकीच्या इतर कायदेशीर व तांत्रिक बाबींची माहिती देण्यात आली. उमेदवारी अर्ज २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत दाखल करता येतील.

महायुतीतील हालचाली

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, बहुतांश ठिकाणी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

  • महायुतीतील घटक पक्ष - भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - यांच्यात जागावाटपासाठी चर्चा सुरू आहे.

  • पुणे व पिंपरी-चिंचवड येथे भाजप आणि अजित पवार गट स्वतंत्रपणे, मात्र मैत्रीपूर्ण लढत लढवण्याची शक्यता आहे.

मविआत घडामोडी

  • वरिष्ठ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेसाठी संभाव्य आघाडीबाबत संपर्क साधला आहे.

  • पुण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात तीन बैठका सुरू आहेत.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये (शरद पवार व अजित पवार) आघाडी होणार का, याबाबत संभ्रम कायम आहे.

logo
marathi.freepressjournal.in