२८७ उमेदवार नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात; १८ नगराध्यक्ष, तर २७९ नगरसेवक; प्रचाराला वेग

जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतमधील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात चारही ठिकाणी मिळून ३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून नगराध्यक्षपदासाठी आता १८ आणि नगरसेवकपदासाठी २७९ असे एकूण २८७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
२८७ उमेदवार नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात; १८ नगराध्यक्ष, तर २७९ नगरसेवक; प्रचाराला वेग
Published on

राजन चव्हाण / सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतमधील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात चारही ठिकाणी मिळून ३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून नगराध्यक्षपदासाठी आता १८ आणि नगरसेवकपदासाठी २७९ असे एकूण २८७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

कणकवलीत नगराध्यक्षपदाचे डमी उमेदवार सौरभ पारकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या १३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

सावंतवाडीत नगरसेवक पदाच्या आठ जणांनी, वेंगुर्त्यात तीन तर मालवणमध्ये सहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. कणकवलीत नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार, सावंतवाडी आणि वेंगुर्त्यात प्रत्येकी सहा, तर मालवणमध्ये तीन उमेदवार रिंगणात आहेत.

नगरसेवकपदासाठी कणकवली ३६, सावंतवाडी ८६, वेंगुर्ले ८६ आणि मालवण ६१ असे एकूण २५९ उमेदवार रिंगणात आहेत. सावंतवाडीतून नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे न घेता तसाच कायम ठेवत बंडखोरी केली आहे.

कॉर्नर सभेचे आयोजन

दरम्यान, जिल्ह्यातील चारही ठिकाणच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून उमेदवारांनी आपापल्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. सध्या प्रत्येक पक्ष घरभेटींवर भर देत असून शेवटच्या आठवड्यात सर्वच पक्षांनी 'कॉर्नर सभा' आयोजित केल्या आहेत.

पक्षाकडून मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, ती मिळाली नाही याचे मला दुःख नाही. जनतेचा मला असलेला पाठिंबा लक्षात घेता मी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहे आणि निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. आतापर्यंत मी शहरातील ७० टक्के घरांमध्ये पोहोचले आहे. सावंतवाडी शहराचा विकास हाच माझा ध्यास आहे. मी निश्चितपणे विजयी होईल.

अन्नपूर्णा कोरगावकर, माजी उपनगराध्यक्ष

नितेश राणे यांची टीका

कणकवलीत तुम्हाला शिंदे सेना चालते, मालवणात का नाही? असा सवाल भाजप नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला आहे. मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी उभाठा चे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर 'मॅच फिक्सिंग'चा आरोप करत त्यांच्याकडून या प्रश्नाचे उत्तर मागितले आहे.

कणकवली शहरात उबाठा सेनेच्या जिल्हा प्रमुखाला निवडून आणण्यासाठी शिंदे सेनेसह शहर विकास आघाडी स्थापन केली जाते, मात्र मालवण शहरात हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात मते का मागत आहेत याचे उत्तर नाईक यांनी जनतेला द्यावे, अशी मागणी राणे यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in