

प्रकाश सावंत
मुंबई : राज्यातील २९ महापालिकांपैकी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह जवळपास २६-२७ महानगरपालिकांमध्ये महायुती विजयी होईल, असा दृढ विश्वास व्यक्त करतानाच, मुंबई महापालिकेत आमची सत्ता आल्यास आम्ही द्वेषाचे राजकारण न करता पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणू व सुधारणा करू, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ‘वर्षा’ निवासस्थानी निवडक पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यात भाजप हाच आता सर्वात मोठा पक्ष असून यापुढे राज्याचे आगामी सत्ताकारण भाजपभोवतीच फिरताना दिसेल, असे भाकित मुख्यमंत्र्यांनी वर्तविले. मुंबईला एक महापालिका पुरेशी असल्याचे सांगतानाच, मुंबई महापालिकेचे विभाजन केले जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. मुंबईचा महापौर मराठी-हिंदू होईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचे सर्वाधिक नुकसान होईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने व दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले, राज्यातील २६-२७ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप, शिंदे सेना किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिघांपैकी एकाचा महापौर होईल. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमचेच बहुमत असेल. मुंबईत आम्ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ.
मुळात अलीकडच्या काळातील निवडणुका भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यावरच अधिक लढल्या गेल्या आहेत. आमच्या विजयाचे रहस्य विचाराल तर हेच सांगेन की गेल्या काही वर्षांत आम्ही जी विकासाची कामे केली आहेत, त्याच्याच आधारे मते मागत आहोत. त्यामुळे जनतेमध्येही एक विश्वास आहे. एक उत्साह आहे.
मराठी मतांचे विभाजन होईल असे वाटते का? यावर ते म्हणाले, मराठी मते एकगठ्ठा कधीच नसतात. आमच्या पक्षाकडे असलेला मराठी वर्ग हा तसूभरही न ढळणारा आहे. त्यामुळे आमची मते अन्यत्र कुठेही जाणार नाहीत.
आगामी काळात विकास हाच प्रमुख मुद्दा असेल. असे सांगून ते म्हणाले की, आम्ही नवी मुंबईजवळ नैना प्रकल्प उभारत असून तो पुण्यापेक्षाही मोठा असेल. त्यात क्रीडा नगरी, शिक्षण नगरीसह अन्य पायाभूत सेवासुविधा देणाऱ्या नगरी असतील. काही ठिकाणी आम्ही स्थानिक विकासकाशीही भागीदारी करून जनतेला हवे असलेले प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुणे रिंग रोडच्या माध्यमातून जो विकास होणार आहे, त्याचेच मूल्य अडीच लाख कोटींचे असेल. महसूल, उद्योगवाढीच्या दृष्टीने आम्ही नवी मुंबई-पुणे दरम्यान ग्लोबल क्षमता केंद्र विकसित करणार आहोत. त्यातून रोजगाराला चालना मिळेल.
या निवडणुकीतील डावपेचाविषयी ते म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीसह काही ठिकाणी आमची ताकद जास्त असूनही आम्ही युतीमधील घटक पक्षांना झुकते माप दिले. जळगावात ५७ नगरसेवक असूनही आम्ही ४७ जागा लढतोय. यातून बेरजेचे गणित साधण्याचा आमचा उद्देश होता व तो यशस्वी होईल.
विरोधक प्रयत्नात कमी पडलेत!
या निवडणुकीत जे चित्र दिसले ते म्हणजे मुंबई, ठाणे वगळता राज्याच्या अन्य भागात कुठेही विरोधक दिसलेच नाहीत. उद्धव व राज ठाकरे यांच्यात आपल्याला सत्तासंपादन करायची असल्याची उर्मीच कुठे दिसून आली नाही. तुम्हाला सांगू, या निवडणुकीत सर्वाधिक नुकसान कुणाचे होणार असेल तर ते राज ठाकरे यांचेच. शिवसेना-मनसे युतीचा फायदा जर कुणाला होणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांना.
तथ्य आढळल्यास कारवाई
आपल्याला एका घोटाळ्यात गोवण्याचा प्रयत्न माजी डीजीपी संजय पांडे यांनी केल्यासंबंधीचा चौकशी अहवाल आपल्याकडे आला असून त्यात तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल, असे सूचक संकेत त्यांनी दिले.
विल्सन जिमखाना वाद
विल्सन जिमखान्याचा भाडेकरार संपल्याने तो आम्हाला द्या, अशी मागणी ‘जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन’ने केली होती. त्यानुसार त्यांना तो देण्यात आला आहे. आता या संस्थेने कराराचा भंग केला, तर त्यांच्याकडूनही तो काढून घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रचाराचे स्वरूप बदललेय
या निवडणुकीत आम्ही प्रचाराचे स्वरूप बदलले. रोड शो, सिलिब्रिटींमार्फत प्रकट मुलाखती घेण्यावर भर दिला. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. उमेदवारांनी सोशल मीडियातून रील्सवर भर दिला. त्यामुळे आमचा प्रचार अधिक प्रभावी ठरला आहे.
घुसखोरांना हुसकावून लावू
मुंबई आयआयटीच्या माध्यमातून ‘एआय टुल’चा वापर करून आम्ही पुढील तीन ते चार महिन्यांत राज्यातील घुसखोरांना बाहेर काढू, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील निवडणुका काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत पार पडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
दादा, गणेश नाईक चुकलेच!
या निवडणुकांमध्ये सत्ताधारी घटक पक्षातील नेत्यांनी परस्पर टीका करायची नाही, असे अलिखित संकेत होते. तथापि, अजितदादा पवार यांनी हे संकेत पाळले नाहीत. पुण्यात यापुढे कशाप्रकारे राजकारण चालते, ते पाहून आगामी पाऊल टाकण्यात येईल. महायुतीचे महापौर ठरविताना संख्याबळ हा निकष नसेल. निवडून येण्याची क्षमता पाहून पुढील डावपेच आखले जातील. नवी मुंबईत गणेश नाईक यांनी शिंदे यांना आव्हान देणे चुकीचे होते, हेही त्यांनी नमूद केले.
देशात फक्त मोदी ब्रॅण्ड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकेकाळी ब्रॅण्ड होते. आता उद्धव वा राज ठाकरे यांचा ब्रॅण्ड नाही. देशात चालतोय तो फक्त मोदी ब्रॅण्ड, अन्य कुणीही नाही.