प्रभाग १५ ‘ब’ च्या निवडणुका लांबणीवर; फलटण, महाबळेश्वर नगरपालिकेसह कराड नगर परिषदेचा समावेश; २० डिसेंबरला होणार मतदान

सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकांसह कराड नगरपरिषदेच्या प्रभाग १५ ‘ब’ मधील निवडणुका तांत्रिक कारणांमुळे स्थगित करण्यात आल्या असून, आता या तिन्ही ठिकाणांच्या निवडणुका २० डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

कराड : सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकांसह कराड नगरपरिषदेच्या प्रभाग १५ ‘ब’ मधील निवडणुका तांत्रिक कारणांमुळे स्थगित करण्यात आल्या असून, आता या तिन्ही ठिकाणांच्या निवडणुका २० डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर दाखल झालेल्या अपिलांवरील निकाल २२ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा न्यायालयाकडून अपेक्षित होते. परंतु काही ठिकाणी हे निकाल २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर लागले. नियमांनुसार उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देणे आवश्यक असते; पण या पालिकांमध्ये तो मिळाला नाही. याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोगाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देत सुधारित वेळापत्रक जाहीर केले.

ज्या प्रकरणांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर आक्षेप वा न्यायालयीन वाद होते, त्या संपूर्ण पालिकेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. यामध्ये फलटण नगरपालिका, महाबळेश्वर नगरपालिका यांचा समावेश असल्याने या दोन्ही ठिकाणची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अतिरिक्त वेळही मिळालेला आहे.

कराड नगरपालिकेच्या प्रभाग १५ ‘ब’ मधील निवडणूकही याच तांत्रिक कारणांमुळे स्थगित करण्यात आली असून, आता मतदान २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० यावेळेत होणार आहे. तथापि, कराड नगरपरिषदेतील उर्वरित सर्व प्रभागांची तसेच थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकानुसार २ डिसेंबर रोजीच पार पडणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in