राज्यातील महानगरपालिकांच्या मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल; आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत होणार लागू?

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल केले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल केले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकतीवरील अंतिम निर्णयानंतरची मतदार यादी २० डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून, अंतिम मतदार यादी २७ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यासंदर्भातील आदेश सर्व महानगरपालिका आयुक्तांना जारी करण्यात आला आहे. तर, प्रभाग निहाय मतदार यादी १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. 

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि सावळागोंधळ आढळून आला आहे. अवघ्या १४ दिवसांत या यादीवर तब्बल ५,४८९ हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. यादीतील घोळ पाहता हरकत व सूचना नोंदणीची मुदत १७ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत १४ लाख दुबार नावे असल्याचा दावा ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर मनसे आणि काँग्रेसने आक्रमक होत मतदार यादीतील त्रुटी सुधारण्याची मागणी केली आहे. २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीत मृत मतदारांची नावे, एकाच व्यक्तीची अनेकदा नोंद, फोटो आणि पत्त्यांमधील तफावत अशा अनेक गंभीर चुका समोर आल्या आहेत. मतदार यादीचा कार्यक्रम वाढविण्याची मागणी शिवसेना आणि मनसेने निवडणूक आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. 

असा आहे सुधारित कार्यक्रम

प्रारूप मतदार यादींवर दाखल हरकतींवर प्रभाग न्याय अंतिम मतदार यादीची तारीख ५ दिवस वाढवण्यात आली आहे त्यामुळे ही यादी  आता १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. तसेच  मतदार केंद्राच्या ठिकाणची यादी २० डिसेंबर २०२५ रोजी तर  मतदार केंद्रनिहाय  यादी  २७ डिसेंबर २०२५ ला प्रसिद्ध होणार आहे. या बदलांमुळे आगामी निवडणूक कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता

महापालिका मतदार याद्या १५ डिसेंबर पर्यंत प्रसिद्ध होणार आहेत. तसेच विधिमंडळाचे अधिवेशन एक आठवडा होणार आहे त्यामुळे साधारण २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू शकते आणि १५ ते २० जानेवारी दरम्यान निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in