मुंबई : जन सुरक्षा कायदा सन २०२४ तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. जन सुरक्षा २०२४ हा काळा कायदा रद्द करा, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्याच्या नावाखाली विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक मंजूर केल्याचा आरोप यावेळी महाविकास आघाडीकडून करण्यात आला.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आले होते. मात्र, या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. या कायद्याविरोधात आता राज्यभरात विरोधकांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. मुंबईत शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी व डाव्या पक्षांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. आमदार डॉ. ज्योती गायकवाड, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, प्रदेश उपाध्यक्ष राजन भोसले, राजेश शर्मा, धनंजय शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विधेयकामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येणार असल्याचा आरोप महाविकास आघाडीचा नेत्यांनी केला. हे विधेयक मागे घेतले नाही तर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
असे केले आंदोलन
विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे व्हेरायंटी चौक येथील गांधी पुतळ्याजवळ अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष, आमदार अभिजीत वंजारी, विशाल मुत्तेमवार यांच्यासह राज्यभरातील विविध जिल्हांच्या ठिकाणी आणि तालुका मुख्यालय समोर आंदोलन केले.