

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारला विविध प्रश्नावरून कोंडीत पकडले. कापूस, सोयाबीनला योग्य भाव मिळालाच पाहिजे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कापसाची माळ घालून आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची झाली माती! अशा घोषणा देत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अन्य प्रमुख नेते व आमदार सहभागी झाले होते.
नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जोरदार आंदोलन करत सत्ताधारी सरकारला धारेवर धरले. विधानसभेचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी गळ्यात कापसाच्या बोंडांची माळ घालून विधानभवनात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनादरम्यान आमदारांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते. निषेधाच्या फलकांवर ज्यावर फसवणीस सरकार असे स्पष्टपणे लिहिले होते, याशिवाय विरोधकांकडून विविध घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.
सरकारने आता तरी जागे व्हावे
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मांडली. विदर्भात अधिवेशन आहे. कापूस, सोयाबीन यांसह इतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. या भूमिकेतून किमान सरकारने आता तरी जागे व्हावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सध्याच्या बाजारभावावर आणि सरकारी धोरणांवर सडकून टीका केली.