मुंबई : राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदांसाठी व थेट अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (दि.२१) होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार असून दुपारपर्यंत बहुतांश निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित भागांत शनिवारी झालेल्या निवडणुकीत ६० टक्के मतदान झाल्याचे समजते.
राज्यात पहिल्या टप्प्यात २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले होते. त्यावेळी ६७.६३ टक्के मतदान झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यातील २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह १५४ सदस्यपदांसाठी शनिवारी मतदान पार पडले. संध्याकाळी ५:३० पर्यंत अंदाजे ६० टक्के मतदान झाले. या दोन्ही टप्प्यातील मतमोजणी रविवारी होणार आहे.
राज्यातील २३ नगर परिषदा व नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि १४३ सदस्यपदांसाठी शनिवारी मतदान झाले. यात मराठवाड्यातील फुलंब्री (जि. संभाजीनगर), वसमत (जि. हिंगोली), धर्माबाद व मुखेड (जि. नांदेड), रेणापूर, निलंगा (जि. लातूर) या ६ पालिकांसह अन्य १७पालिकांच्या ३८ प्रभागांचा समावेश आहे.
आरक्षणाचा तिढा न्यायालयात अडकून पडल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर चार वर्षाच्या विलंबानंतर या निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीत 'मविआ'ने बाजी मारली होती, तर लाडक्या बहिणींमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले होते. त्यानंतर आता प्रथमच निवडणुका होत असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसमत ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ
वसमत नगरपालिकेसाठी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक १५ मधील लिट्ल इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 'मॉकपोल' दरम्यान मशीनमधील बटन दबत नसल्याने हा गोंधळ झाला.
अंबरनाथमध्ये बोगस मतदानासाठी आलेल्या १७४ महिलांवर गुन्हे
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदानासाठी बाहेरुन आणण्यात आलेल्या १७४ महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या महिलांना ज्या मॅरेज हॉलमध्ये ठेवले होते. त्याच्या मालकावरही कारवाई करण्यात आली आहे. या मॅरेज हॉलच्या मालकाचे नाव कृष्णा रसाळ असे असून तो शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे. अंबरनाथमध्ये एका सभागृहात बोगस मतदानासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने २०० पेक्षा जास्त महिला आणल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपने केला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.