

विरेंद्र तळेगांवकर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित २०४७ भारताच्या स्वप्नपूर्तीकरिता महाराष्ट्राची साथ मिळावी या हेतूने देशव्यापी संघटना असोचेमने पुढाकार घेतला असून उद्योग संस्थेने केलेल्या शिफारशी अमलात आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डाॅलर बनविण्याच्या हेतूने संघटनेने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्त्वावर आधारित नवे केमिकल्स, पेट्रोकेमिकल्स धोरण पुढच्या महिन्यात - ऑक्टोबरमध्ये जाहीर होणार आहे.
राज्य सरकार आणू पाहत असलेल्या नव्या केमिकल्स, पेट्रोकेमिकल्स धोरणामुळे महाराष्ट्रातील उद्योग असमतोल नाहीसा होणार असून विदर्भ, मराठवाड्याबरोबरच चैथ्या आणि तिसर्या मुंबईवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या अंतर्गत समर्पित केमिकल्स पार्क, पेट्रोकेमिकल्स फिडस्टॅक, केमिकल्स इन्होव्हेशन पार्क हे विशेषत: राज्याच्या सागरी मार्गानजीकच्या कोंकण परिसरात विकसित केले जाणार आहेत.
या क्षेत्रातील कंपन्यांना भेडसावणाऱ्या टाकाऊ रसायन, प्रदुषित व धोकादायक साहित्य यावर उपाय म्हणून शून्य रसायन स्रोत, पुनर्प्रक्रिया वा विघटन तसेच सुरक्षा व पर्यावरण यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या उद्योगांचा सन्मान, निर्यात प्रोत्साहन तसेच प्रोत्साहन साहाय्य याबाबतही नव्या आर्थिक धोरणात विचार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
असोचेम या देशव्यापी उद्योग संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष मिलिंद हर्डीकर यांनी `नवशक्ति`ला सांगितले की, विकसित राज्याच्या दृष्ट्रीने निवडक अशा १० ते १२ क्षेत्रांवर आम्ही भर दिला आहे. त्यातीलच एक - केमिकल्स, पेट्रोकेमिकल्सबाबत केमिकल्स स्टोरेज हब, केमिकल लॅजिस्टिक्स सेंटरच्या माध्यमातून राज्यातील भैगोलिक अनुशेष नव्या धोरणातून भरून निघण्याची आशा आहे.
असोचेमच्या वरिष्ठ संचालक मंजु नेगी यांनी सांगितले की, असोचेमच्या शिफारशींवर सकारात्मक प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून राज्याच्या विकासात येथील उद्योगाची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याच्या विकासासाठी उद्योग संघटनेच्या माध्यमातून राज्य शासन आणि उद्योग यांच्यातील दुवा बनण्याचे काम असोचेम यापुढेही करत राहील.
प्रमुख पायाभूत सुविधा व व्यवसाय सुलभता याबाबत महाराष्ट्र आता परिपूर्ण झाला आहे. आता येथील उद्योगाने पुढाकार घेण्याची संधी आहे. त्याचेच एक पाऊल म्हणून असोचेमच्या वतीने राज्य शासनाला काही शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यातील एक केमिकल्स व पेट्रोकेमिकल्स क्षेत्र आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडसारख्या भागात या क्षेत्राचे क्लस्टर विकसित करण्यास पुरेसा वाव आहे.
मिलिंद हर्डीकर, अध्यक्ष - महाराष्ट्र शाखा, असोचेम
महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा
केमिकल्स व पेट्रोकेमिकल्स - १९ टक्के
इंधन क्षेत्र निर्यात - १७ टक्के
माहिती तंत्रज्ञान - १२ टक्के
अवकाश व संरक्षण - १७ टक्के
वित्त व बँक क्षेत्र - १८ टक्के