२०० वर्षांनी घरात जन्माला आली मुलगी; ढोल-ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढत लेकीचे जंगी स्वागत

बँड-बाजा, फटाक्यांची आतषबाजी आणि सजवलेल्या रथातून मिरवणूक... बीड जिल्ह्यातील दहिफळे कुटुंबात मुलीच्या जन्माचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तब्बल २०० वर्षांनंतर आपल्या थेट वंशपरंपरेत मुलीचा जन्म झाला...
२०० वर्षांनी घरात जन्माला आली मुलगी; ढोल-ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढत लेकीचे जंगी स्वागत
२०० वर्षांनी घरात जन्माला आली मुलगी; ढोल-ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढत लेकीचे जंगी स्वागत
Published on

बीड : बँड-बाजा, फटाक्यांची आतषबाजी आणि सजवलेल्या रथातून मिरवणूक... बीड जिल्ह्यातील दहिफळे कुटुंबात मुलीच्या जन्माचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तब्बल २०० वर्षांनंतर आपल्या थेट वंशपरंपरेत मुलीचा जन्म झाला, असा कुटुंबीयांचा दावा आहे.

परळी वैजनाथ येथील रहिवासी कल्पना दहिफळे यांनी २७ ऑगस्ट रोजी स्थानिक रुग्णालयात मुलीला जन्म दिला. पती ऋषिकेश यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी या ‘कन्यारत्ना’च्या आगमनाचे जल्लोषात स्वागत केले. मुलीचे आजोबा लिम्बाजी दहिफळे हे स्थानिक भगवान प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्या थेट पूर्वजांच्या वंशावळीत जवळपास दोनशे वर्षांपासून मुलीचा जन्म झालेला नव्हता. त्यामुळे या बाळाच्या जन्माने कुटुंबातील तब्बल दोन शतकांचा ‘कन्यारत्नाचा दुष्काळ’ संपला आहे.

"आमच्या घराण्यात इतक्या वर्षांपासून मुलगी नव्हती, याची मनाला सतत एक रुखरुख लागून राहिली होती. आज ती उणीव पूर्ण झाली. घरात मुलगी असणे हे भाग्याचे लक्षण आहे. मी माझ्या दोन्ही सुनांना मुलींसारखाच सांभाळ केला आहे, पण आता नात आल्याने आनंदाला उधाण आले आहे", असे सांगताना आजोबांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मीचे पाऊल पडले

"आम्ही मुलीला अगदी फुलासारखं जपणार आहोत. चार पिढ्यानंतर मुलगी झाली आहे, त्यामुळे मुलीचे महत्त्व काय आहे हे आम्हाला समजते. जवळपास दोनशे वर्षानंतर आमच्या घरात मुलीचा जन्म झालाय. अनेक जण मुलगा व्हावा अशी अपेक्षा ठेवतात, पण लेकीच्या जन्माचा आनंद आणि भावना काही वेगळीच असते. मुलींचे आपल्या वडिलांवर जास्त प्रेम असते. त्यामुळे मला नेहमीच मुलगी हवी होती", असे वडील ऋषिकेश दहिफळे म्हणाले. मुलीचे नाव गार्गी असे ठेवण्यात आले असून घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मीचे पाऊल पडले असल्याचे सर्वच नातलगांचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in