शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! आता एसटीचा पास काढण्याचे 'नो टेन्शन', उद्यापासून राज्य परिवहन महामंडळाची विशेष मोहीम

विद्यार्थ्यांना आता पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज नाही...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्य सरकारने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी प्रवासात ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने शाळा- महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचा प्रवास पास थेट शाळांमध्ये वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. या निर्णयाचा लाभ राज्यातील लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे. या संदर्भात १८ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे "एसटी पास थेट तुमच्या शाळेत" ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

विदर्भवगळता राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येणार आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घ्यावे लागत होते. पण, यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.

बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पास

सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. या विद्यार्थिनींना आता थेट शाळेत पास मिळणार असल्याने विद्यार्थिनींची रागांमध्ये उभे राहण्यापासून सुटका होणार आहे.

१८ जूनपासून विशेष मोहीम

या संदर्भात १८ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे "एसटी पास थेट तुमच्या शाळेत" ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in