विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ८ ऑगस्ट २०२२ रोजी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचाराची प्रकरणे लावून धरली. मात्र आता...
विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत
Published on

गिरीश चित्रे/मुंबई

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ८ ऑगस्ट २०२२ रोजी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचाराची प्रकरणे लावून धरली. मात्र आता अंबादास दानवे यांचा कार्यकाळ २९ ऑगस्ट २०२५ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांची पावसाळी अधिवेशनातील ही अखेरची टर्म आहे. हे पद ठाकरे गटाकडे असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना नेते अनिल परब यांनीही देव पाण्यात ठेवल्याचे समजते. मात्र विधान परिषदेत संख्याबळ अधिक असल्याने काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी या पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली असून त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असले तरी काँग्रेसचे भाई जगताप हेसुद्धा या शर्यतीत असल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आणि राज्यात ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत आले. महायुतीने सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, मंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. परंतु नाशिक व रायगड वगळता पालकमंत्री जाहीर करण्यात आले आहेत. राज्यात सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर लक्ष ठेवत राज्यातील जनतेला सोयीसुविधा उपलब्ध होतात की नाही, यावर लक्ष ठेवणे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी असते. मात्र नागपुरातील हिवाळी, मुंबईतील अर्थसंकल्पीय आणि आता सध्या सुरू असलेले पावसाळी अशी तीन अधिवेशने झाली असली तरी विधान सभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. या पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाला महाविकास आघाडीने पसंती दर्शवली असली तरी मंगळवारी पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करा, यासाठी विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरले.

दुसरीकडे, विधान परिषदेचे विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे राहावे, यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी देव पाण्यात ठेवले आहेत, तर विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने काँग्रेसही हे पद सोडण्यास तयार नसून त्यांनी सतेज पाटील यांचे नाव निश्चित केल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

अनिल परब सुद्धा उत्सुक

विधान परिषदेसाठी विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा मविआत कायम आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अनिल परब यांनी देव पाण्यात ठेवले असून विधान परिषदेत काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. मात्र त्यांना आपल्याच पक्षातील भाई जगताप यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in