
मुंबई : महायुती सरकारचे दुसरे विधिमंडळ अधिवेशन सुरू असले तरी विरोधी पक्षनेतेपद अद्यापही रिक्त आहे. महाविकास आघाडीतील नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, यासाठी विरोधक मंगळवारी आक्रमक झाले. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी विधिमंडळात विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला. मात्र, त्याला विधानसक्षा अध्यक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर विरोधी पक्षांनी सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा पार पडल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपदाबाबतचे निवेदनही सादर केले.
विधानभवनात मंगळवारी सकाळी विरोधी पक्षनेतेपदाबाबत महाविकास आघाडीतील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला भास्कर जाधव, अजय चौधरी, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे उपस्थित होते. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय कधी घेणार? हा प्रश्न विधानसभा अध्यक्षांना सभागृहात विचारण्यात आला. त्यावर, आपल्या दालनात यावर चर्चा झाल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. तसेच, ठरल्याप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभा अध्यक्षांचे उत्तर महाविकास आघाडीतील आमदारांना रेकॉर्डवर मिळाले. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले आणि लवकरात लवकर विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात यावी, अशी मागणी आमदारांनी केली.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून थेट बाहेर येऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सरन्यायाधीशांचा सत्कार होत असताना सभागृह विरोधी पक्षाविना असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेतेपदावर आक्रमक होऊन महाविकास आघाडीतील आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्यानंतर विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव, जयंत पाटील आदी नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरला.
विरोधकांकडून भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी सुचविण्यात आले आहे. पण त्यावर अद्याप विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाही. सरकार सत्तेत आल्यापासून हा निर्णय बारगळलेला आहे. विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक पुरेसे संख्याबळ नसल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तर विधानसभा अध्यक्षांकडून नियम व परंपरांचा विचार करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेतेपदाचा वाद थेट सरन्यायाधीशांच्या कोर्टात
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात सत्कार झाल्यानंतर त्यांच्याकडेही हा वाद नेण्यात आला. सत्कार झाल्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांनी सरन्यायाधीशांना याबाबतचे निवेदन दिले. शिवेसना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “विरोधी पक्षनेतेपद तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि मूळ पक्षाच्या वादाकडेही त्यांनी सरन्यायाधीशांचे लक्ष वेधले. सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्षनेतेपदाची निवड केलेली नाही, याबाबत सरन्यायाधीशांना अवगत करण्यात आले आहे.”