

मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या काटकसरीच्या आवाहनावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी सोमवारी कडाडून टीका केली. हे आवाहन म्हणजे केंद्र सरकारचे धोरणात्मक अपयश असून, सरकारने देशाची अर्थव्यवस्था कमकुवत केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी इंधनाचा वापर जपून करणे, सोने खरेदी पुढे ढकलणे आणि परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले होते.
निवडणूक संपल्या की आता यांना सोन्याचे भाव तसेच पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडल्याचे आठवत आहे. हे सर्व आधीपासूनच आहे. मात्र, यांना माणसं जगो अथवा मरो त्याचे काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे, अशा शब्दांत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मुंबईकरांनो रोज कामावर चालत जावा. हीच देशभक्ती आहे, असा उपरोधिक टोलाही विरोधकांनी लगावला आहे.
ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना चपराक - अनिल परब
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपात्कालीन परिस्थितीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करा, हे पंतप्रधानांनी सांगितले आहे. थोडक्यात मोदींनी कोरोनाची भूमिका मांडली आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे 'वर्क फ्रॉम होम 'करत होते, त्या सगळ्यांना मोदींनी उलटी चपराक मारलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी आता पंतप्रधानांना प्रश्न विचारावा की, तुम्ही घरी बसून काम करणार का? तुम्ही घरून कशाला काम करत आहात, या मैदानात, अशा शब्दात परब यांनी शिंदे गटाला टोला लगावला.
सरकारचे धोरणात्मक अपयश - प्रियांका चतुर्वेदी
शिवसेना (यूबीटी) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधानांचे आवाहन म्हणजे केंद्र सरकारचे धोरणात्मक अपयश असल्याचे म्हटले आहे. निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कारभारामुळे आणि सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे निर्माण झालेली महागाई नागरिक आधीच सोसत आहेत. मध्यपूर्वेतील संघर्ष हाताळण्यात आलेले अपयश आणि निवडणुकीशी संबंधित निर्णयांचा भार आता जनतेवर टाकून त्यांना जनतेला तेल वाचवण्यास किंवा प्रवास टाळण्यास सांगता येणार नाही, असे चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले.
भाजपने आधी स्वत: आदर्श घालून द्यावा - क्रास्टो
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपने जनतेला उपदेश करण्यापूर्वी स्वतः आदर्श घालून द्यावा, असे म्हटले आहे. भाजप सरकार आणि त्यांचे नेते आता घरून काम करण्यास प्राधान्य देतील का, मोठ्या ताफ्यांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून इंधन वाचवतील का, तसेच परदेशी ब्रँड्स सोडून स्वदेशीचा स्वीकार करून एक वर्ष परदेश दौरे टाळतील का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. भाजपने आधी स्वतः कृती करावी, अन्यथा हे केवळ लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे नाटक ठरेल, अशी टीका क्रास्टो यांनी केली.
सरकारच्या नियोजनाअभावी देश संकटात - वर्षा गायकवाड
मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मोदी सरकारच्या नियोजनाच्या अभावामुळे देश संकटात आल्याचा आरोप केला. पंतप्रधानांनी देशापुढील अडचणी मान्य करून स्वतःच्या सरकारचे अपयश स्वीकारले आहे. पंतप्रधान स्वतः ८,००० कोटी रुपयांच्या विमानातून फिरतात आणि महागड्या वस्तू वापरतात, अशा परिस्थितीत त्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी प्रथम स्वतःच्या जीवनात काटकसर अंगीकारावी, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांनीही मोठ्या ताफ्यांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असेही त्या म्हणाल्या.
पंतप्रधानांची भूमिका दुटप्पी - लोंढे
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पंतप्रधानांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना सांगितले की, जनतेला पेट्रोल-डिझेल वाचवण्यासाठी मेट्रोने फिरण्याचे सल्ले दिले जात आहेत आणि दुसरीकडे पंतप्रधान स्वतः १०० वाहनांच्या ताफ्यासह रोड शो करत आहेत.
देशाला केवळ ‘इव्हेंट मॅनेजर’ मिळाला - हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान केवळ इव्हेंट, फोटोशूट आणि निवडणूक प्रचार सभांमध्ये मग्न असून सामान्य जनतेला मात्र कष्टाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या इंधन आणि एलपीजीचा तुटवडा असून महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशाला एका दूरदृष्टी असलेल्या नेत्याची गरज होती, मात्र देशाला केवळ एक ‘इव्हेंट मॅनेजर’ मिळाला आहे, अशा शब्दांत सपकाळ यांनी 'एक्स'वर आपली टीका नोंदवली. निवडणूक विजयासाठी मोदी सरकारने अर्थव्यवस्था कमकुवत केली. आता नागरिकांना डिझेल आणि खाद्यतेलाच्या वापरात कपात करून बलिदान देण्यास सांगत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उशिरा सुचलेले शहाणपण - खडसे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे वर्णन ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ असे केले. मात्र तरीही राष्ट्रीय हितासाठी नागरिकांनी याचे पालन करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मोदींची ढोंगी भूमिका - अरविंद सावंत
तुम्ही हे सर्व आधीच सहा महिने का केले नाही, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. तुम्ही जगभर फिरता आणि देशासाठी फिरतो असे सांगता. तुमची ही ढोंगी भूमिका आहे. या ढोंगामुळे देशाचे वाटोळे झाले आहे, असा घणाघात सावंत यांनी केला.
ही सर्व नौटंकी - जितेंद्र आव्हाड
येणाऱ्या काळात पेट्रोल, डिझेलचे भाव वाढणार आहेत. घोडा, गाय, म्हैस काय स्वस्त विकणार? जय मोदी, जय मोदी करत गाय-घोडे यांच्यावरती बसून प्रवास करावा लागणार आहे का, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. येणाऱ्या काळात पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल डिझेल कमी वापरा असे मोदी अचानक का सांगत आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक होईपर्यंत ही सर्व नौटंकी होती, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.