
मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे २६ जून २०२५ रोजीचे ५.३० पासून ते २८ जून २०२५ रोजी ११.३० पर्यंत ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सांगितले.
राज्यात मागील २४ तासांमध्ये (२७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) वाशिम जिल्ह्यात ५२.८ मिमी पाऊस झाला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात ४४.८ मिमी, वर्धा जिल्ह्यात ३९.२ मिमी, जळगावात २८.२ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २६.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात गुरुवारपासून २७ जून रोजी सकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यात १६.४ मिमी, रायगड २६.७, रत्नागिरी १२.८, सिंधुदुर्ग १३.६, पालघर १९.३, नाशिक ८.२, धुळे १०.५, नंदुरबार २, जळगाव २८.२, अहिल्यानगर १.२, पुणे ८.६, सातारा ४, सांगली १.७, कोल्हापूर ८.९, छत्रपती संभाजीनगर १७.४, जालना १५.२, बीड १.६, लातूर १.२, धाराशिव ०.४, नांदेड ३, परभणी ९.१, हिंगोली १४.८, बुलढाणा ४४.८, अकोला ११.९, वाशिम ५२.८, अमरावती १४.८, यवतमाळ १९.७, वर्धा ३९.२, नागपूर ११.२, गोंदिया ०.२, चंद्रपूर ८.२ आणि गडचिरोली जिल्ह्यात १२.४ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे शेड पडून यवतमाळ जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्ती व एक प्राण्याचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यात पुरात वाहून एक व्यक्ती व दोन प्राण्यांचा मृत्यू आणि मुंबई शहर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळीमधील दिगडोह येथे तीन शाळकरी मुले पुराच्या पाण्यामध्ये अडकली होती. त्यांना देवळी नगरपालिका व फायर ब्रिगेड यांनी सुरक्षितपणे वाचवले.