महाराष्ट्राने केली लोडशेडिंगवर मात

वीजेची मागणी घटली; कोळशाचा पुरवठा सुरू
महाराष्ट्राने केली लोडशेडिंगवर मात

उत्तर प्रदेश, राजस्थानसहित अनेक राज्यांवर वीजसंकट ओढवले असले तरी महाराष्ट्राने मात्र लोडशेडिंगवर मात केल्याचे चित्र आहे. महाजनकोकडून होणारी वाढीव वीजनिर्मिती तसेच कोल इंडियासह समभागधारकांकडून कोळशाचा होणारा अविरत पुरवठा यामुळे राज्यावरील लोडशेडिंगचे संकट तूर्तास टळले आहे.

सार्वजनिक सुट्ट्या आणि महत्त्वाच्या वेळेत (पिक अवर्स) वीजेची मागणी घटल्यामुळे महावितरणने २३ एप्रिलपासूनच लोडशेडिंग बंद केले असून यापुढेही वीजेचा अविरत पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. “महाजनकोचे २७ यूनिट्स पूर्ण क्षमतेने कार्यरत असून २७ एप्रिलपर्यंत त्यातून ७७६१ मेगावॅट वीजनिर्मिती केली जात होती. महाजनकोला गेल्या आठवड्यात जवळपास रोज १ लाख ३० हजार टन कोळसा पुरवठा केला होता. वीजेची मागणी सध्या घटली असून कोळशाच्या उपलब्धतेमुळे महाजनको ८ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी सक्षम आहे,” असे महाजनकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

“उन्हाळ्यात अचानक वीजेची मागणी वाढल्याने तसेच कोळशाचा पुरवठा नीट होत नसल्याने लोडशेडिंगचा पर्याय निवडावा लागला होता. त्यामुळेच उन्हाळ्यात कोळशाच्या पुरवठ्यावर मात करण्यासाठी आम्ही चोख नियोजन केले होते. आता पावसाळ्यातही कोळशाचा साठा कमी पडू नये, यासाठी रणनीती आखली आहे. सिंगारेनी कोलिराइज कंपनी लिमिटेडच्या परळी यूनिटमधून ६ लाख टन कोळशासाठी आम्ही सामंजस्य करार केला आहे,” असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्राला १४८२ कोटी रुपये देऊ केले

कोळशाच्या पुरवठ्याबाबतची केंद्र सरकारची थकबाकी २३९० कोटी असून त्यापैकी महाजेनकोने १४८२ कोटी रुपयांची रक्कम केंद्राकडे जमा केली आहे. ‌उर्वरित थकबाकी लवकरच केंद्राला देण्यात येईल, असेही महाजेनकोकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in