

मुंबई : महाराष्ट्रातील निवृत्त पोलीस श्वानांना आता दत्तक देऊन अन्यत्र पाठविले जाणार नाही. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही या श्वानांना पोलीस दलासोबतच राहता येणार असून, त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत अन्न, वैद्यकीय उपचार आणि देखभालीची जबाबदारी पोलीस विभाग घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस श्वानांनी दहा वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना सध्या निवृत्त करून योग्य दत्तकदारांकडे सोपविले जाते. मात्र, गृह विभागाच्या अहवालात अशा श्वानांना नव्या ठिकाणी जुळवून घेताना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी वर्षानुवर्षे काम केले, त्यांच्यापासून दूर गेल्यानंतर काही निवृत्त श्वानांनी अन्न घेणेही बंद केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालाची दखल घेतमुख्यमंत्री फडणवीस यांनी निवृत्त पोलिस श्वानांना पोलिस दलातच ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश गृह विभागाला दिले.
“पोलिस दलासाठी दहा वर्षे समर्पित आणि निष्ठेने सेवा केल्यानंतर अशा श्वानांना त्रास होणे योग्य नाही. ते प्राणी असले तरी त्यांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
पोलिस श्वान हे पोलिस दलाचा महत्त्वाचा भाग आहेत. स्फोटके व अमली पदार्थ शोधणे, गुन्हेगारांचा माग काढणे, शोध व बचाव मोहिमांमध्ये मदत करणे तसेच अपघात आणि आपत्तीच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, अशी विविध कामे ते करतात.
नव्या व्यवस्थेनुसार निवृत्तीनंतरही श्वानांना त्यांच्या परिचित पोलिस वातावरणात आणि शक्य असल्यास त्यांच्या परिचित कर्मचाऱ्यांसोबत राहता येईल. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी अन्न, आरोग्यसेवा आणि आवश्यक देखभालीचा खर्च पोलिस विभाग करणार आहे.
या निर्णयाचे प्राणीप्रेमी आणि श्वानप्रेमींनी स्वागत केले असून, पोलिस दलासाठी आयुष्यभर निष्ठेने सेवा करणाऱ्या श्वानांना सन्मानाने निवृत्तीचे आयुष्य देण्याच्या दृष्टीने हे संवेदनशील पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दहा वर्षांची सेवा, नंतर एक वर्षाचे आयुष्य
पोलीस श्वान साधारणपणे वयाच्या ६ ते ९ आठवड्यांपासून दलात दाखल होतात. त्यानंतर त्यांना विविध जबाबदाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण दिले जाते. साधारण १० वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्त केले जाते. दहा वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पोलीस श्वानांचे सरासरी उर्वरित आयुष्य केवळ एक ते दीड वर्ष असते. त्यामुळे या काळात त्यांना परिचित वातावरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.