पोलीस पीएसआय पदाच्या पुन्हा परीक्षा; तरुण अंमलदारांना मिळणार संधी

पोलीस अंमलदारांना पीएसआय पदासाठी २५ टक्के आरक्षणा अंतर्गत विभागीय परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पोलीस पीएसआय पदाच्या पुन्हा परीक्षा; तरुण अंमलदारांना मिळणार संधी
Published on

मुंबई : पोलीस अंमलदारांना पीएसआय पदासाठी २५ टक्के आरक्षणा अंतर्गत विभागीय परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तरुण अंमलदारांना संधी मिळणार आहे.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एप्रिल २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची खाते अंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर बुधवारी याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.

पूर्वी किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलीस अंमलदारांना पीएसआय पदासाठी २५ टक्के आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक मेहनती व अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत होती. मात्र फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती.

पोलीस कॉन्स्टेबलना प्रमोशनद्वारे पीएसआय पद मिळते ते त्यांच्या सेवाकालाच्या शेवटच्या टप्प्यात. अशावेळी त्यांना या पदावर दोन-तीन वर्षेच काम करता येते. परंतु विभागीय परीक्षेतून पीएसआय झालेल्यांना कमी वयातच पदोन्नती मिळाल्याने त्यांना पुढील २० ते २५ वर्षे पीएसआय पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते.

या निर्णयामुळे राज्यातील मेहनती, अनुभवी तसेच तरुण पोलीस अंमलदारांसाठी पीएसआय पदाचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. अन्यथा, त्यांना अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली असती. आता विभागीय परीक्षा त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीसाठी नवे दार उघडेल. - योगेश कदम, गृहराज्यमंत्री

logo
marathi.freepressjournal.in