
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सत्ताधाऱ्यांसाठीच डोकेदुखीचे ठरले. शेतकऱ्यांविषयी काढलेल्या वादग्रस्त विधानांमुळे तसेच विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडले होते. दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांचे मंत्रिपद थोडक्यात बचावले असले, तरी त्यांच्याकडील कृषी मंत्रिपद आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच भरणेंकडील क्रीडा खाते कोकाटेंना दिले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुरुवारी सकाळी झालेल्या बैठकीदरम्यान खात्याची अदलाबदली करण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
कोकाटे यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यात गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत कोकाटे यांचे खाते बदलून क्रीडामंत्री भरणे यांच्याकडे कृषी मंत्रिपदाची जबाबदारी द्यायची, यावर तिघांमध्ये एकमत झाल्याचे समजते. नाशिक दौऱ्यावर असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांप्रति वादग्रस्त विधान केले. त्यावर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती, तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळतानाचा कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र, मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली आणि दिलगिरी व्यक्त केली.
महायुतीत वेगवान घडामोडी सुरू
महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्याला दुजोरा मिळणाऱ्या घडामोडी गुरुवारी घडल्या. एकीकडे मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे आणि कृत्यांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर असतानाच, इकडे ‘सह्याद्री’ अतिथीगृहात बैठकांचा सिलसिला सुरू आहे. गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सर्वमान्य तोडगा काढला. त्यातच माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सलग दोन दिवस मुख्यमंत्र्यांची भेट घेत मंत्रिपदासाठी लॉबिंग केल्याचे समजते.