
पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्रीकरणाच्या चर्चाना वेग आलेला असतानाच, सोमवारी पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शेजारी बसणे पुन्हा एकदा टाळले.
व्यासपीठावर अजित पवार आणि शरद पवार यांच्या खुर्च्या आजूबाजूला होत्या. पण, अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी असलेली त्यांची नेमप्लेट उचलली आणि तिथे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची नेमप्लेट सरकवली.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांची विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढलेल्या जवळीकीच्या आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची ही कृती पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. या घटनेने पवार काका-पुतण्याच्या राजकारणातील सस्पेन्स कायम राहिला आहे.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सुरुवातीचे एक वर्ष अजित पवारांनी शरद पवारांसोबत कोणत्याही कार्यक्रमासाठी एकत्र येणे टाळले होते. मात्र, राज्य सरकारमध्ये त्यांच्या पक्षाची कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
'संभ्रम नको' म्हणून?
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात आयोजकांनी प्रोटोकॉलनुसार केलेली बैठक व्यवस्था स्वतः बदलत, अजित पवारांनी ही 'सावध भूमिका' घेतली असून, आज (मंगळवार दि. १० जून) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात स्वतंत्र वर्धापनदिन कार्यक्रम असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कोणताही 'संभ्रम नको' यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.