
मुंबई : विधानपरिषदेत सभापती व उपसभापती हे नियमबाह्य काम करतात. विरोधकांना सभागृहात मत मांडण्यासाठी मर्यादा घालतात. विरोधी पक्षाची प्रत्येक बाबतीत अडवणूक केली जाते. सभापती व अध्यक्षांचे काम पक्षपातीपणाचे असल्याचा आरोप करून गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांची भेट घेत निवेदन दिले.
संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भूमिका ही सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. सभागृहामध्ये सभापती व अध्यक्ष यांच्याकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपातीपणा व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियमबाह्य पद्धतीने सभागृहाचे कामकाज चालविले जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अनिल परब, भास्कर जाधव, भाई जगताप, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनील राऊत, सचिन अहिर, आनंद बाळा नर, प्रवीण स्वामी, अभिजित वंजारी, अजय चौधरी, सुनील शिंदे, अरुण शेठ, ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील व वरुण सरदेसाई हे यावेळी उपस्थित होते.