
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी पक्षात डावलले जात असल्याची भावना व्यक्त केली असून क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नाही, अशी खंतही बोलून दाखवली. तसेच राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवे. मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काय रडत बसायचे का? उलट मी लढत आहे. मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी जे फुटून गेले त्यांच्याबरोबरही गेलो नाही, अशी खदखद भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
शिवसेनेचा शाखाप्रमुख हाच शिवसेनेचा कणा होता, पण कुठेतरी शिवसेनेत शाखाप्रमुखच बाजूला होत असल्याचे मला दिसले, म्हणून त्याच अनुषंगाने आज शिवेसना पक्षाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे, परंतु शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळे कारण नाही, असे म्हणत भास्कर जाधव यांनी निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले.
भास्कर जाधव म्हणाले, संजय राऊत मला दरवेळी सावरण्याची भाषा करतात. पण, मला भाषण करायला मिळत नाही म्हणून मी नाराज होत नाही. सगळ्या गोष्टींचे मला चांगले भान आहे. पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी नाराज, असा संदेश देण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न असतो. मात्र, पक्षाकडूनही कधीही तसे होत नाही. व्यासपीठावर शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असतात, आदित्य ठाकरे हेही असतात. तरीही मला तिसऱ्या क्रमांकावर भाषण करायची संधी दिली जाते. माझ्यानंतर संजय राऊत आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषण करतात.
पक्षप्रमुख दखल घेतील - संजय राऊत
भास्कर जाधव काय बोलले? त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. पण अशा प्रकारे त्यांना मन मोकळे करायचे असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर बोलायला काहीच हरकत नाही. ते आमचे जवळचे सहकारी आहेत. मित्र आहेत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी व्यासपीठावर भास्कर जाधव यांनी भाषण केले. ते सातत्याने पक्षात त्यांची भूमिका मांडत असतात. यापुढेही ते त्यांच्या भूमिका मांडत राहतील. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षप्रमुख त्यांची दखल घेतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पवारांची साथ सोडणे हे कधी कधी चुकीचे वाटते!
शरद पवार यांची साथ सोडणे हे मला कधी कधी चुकीचे वाटते. मी शरद पवार यांना सोडल्याचा निर्णय चुकीचा होता, हे मी याआधीही स्पष्टपणे बोललो. पण, मला त्याची खंत वाटते असे अजिबात नाही.