
पुणे : पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा आणि अनपेक्षित धक्का बसण्याची शक्यता आहे. पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुणे जिल्ह्यात काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या संग्राम थोपटे आणि रवींद्र धंगेकर यांच्यानंतर जगताप यांचा संभाव्य प्रवेश काँग्रेससाठी तिसरा मोठा झटका मानला जात आहे.
एकेकाळी पुणे जिल्ह्यावर काँग्रेस पक्षाचे मोठे वर्चस्व होते, मात्र आता त्यांचे एक एक 'शिलेदार' पक्षाची साथ सोडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर, काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. या घडामोडींमुळे पुणे जिल्हा आणि बारामती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि काँग्रेसला जोरदार धक्का बसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
संजय जगताप हे पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी त्यांचा पराभव केला होता. निवडणूक निकालानंतर जगताप काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते, असे सांगितले जाते. अलीकडेच, सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांची भेट घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली आहे. कार्यकर्त्यांचा मोठा रेटा असल्याने जगताप भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. पुरंदर तालुक्यात काँग्रेस पक्षावर माजी आमदार संजय जगताप यांच्या कुटुंबाची मजबूत पकड आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसची साथ सोडल्यास तो पक्षासाठी अत्यंत मोठा धक्का ठरू शकतो.
विशेष म्हणजे, पुरंदर तालुक्यात विजय शिवतारे यांना उघडपणे शह देणारे फारसे कोणी भाजपमध्ये उत्सुक नाहीत; मात्र, संजय जगताप भाजपमध्ये आल्यास शिवतारेंना मोठा शह बसणार हे निश्चित मानले जात आहे. पुणे जिल्ह्यात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी भाजप गेल्या काही काळापासून प्रयत्न करत असून, संग्राम थोपटे यांचा प्रवेश त्याच रणनीतीचा भाग होता.
या सर्व चर्चांदरम्यान, माजी आमदार संजय जगताप यांनी यापूर्वी वारंवार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या बातम्या नाकारल्या होत्या. अद्यापही त्यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे त्यांच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपला मोठे राजकीय बळ मिळणार
संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर तालुक्यात भाजपला मोठे राजकीय बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची 'महायुती' सत्तेत आहे. जगताप यांच्या संभाव्य प्रवेशामुळे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. अनेक वर्षांपासून पुरंदर तालुक्यात सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला संजय जगताप यांच्या माध्यमातून एक मजबूत आधार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.