
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना परवानगीशिवाय आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही, असा महत्वाचा निर्णय बॉम्बे हायकोर्टाने मंगळवारी दिला. सार्वजनिक ठिकाणे अनिश्चितकाळासाठी व्यापून ठेवता येत नाहीत, असे म्हणत बॉम्बे हायकोर्टाने संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही असे स्पष्ट केले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला.
मनोज जरांगे यांना उपोषण करण्यासाठी नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा पर्याय महाराष्ट्र सरकारपुढे खुला आहे, असेही हायकोर्टाचे एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. मुंबईतील दैनंदिन जीवनाचा वेग खंडित होऊ नये म्हणून जरांगे यांना शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी ठिकाण उपलब्ध करून द्यायची का, याचा निर्णय सरकार घेऊ शकते, असे कोर्टाने म्हटले. खंडपीठाने स्पष्ट केले की, जरांगे आणि त्यांचे सहकारी संबंधित अधिकाऱ्यांकडे आवश्यक परवानगीसाठी अर्ज दाखल करू शकतात. त्यानंतर सरकारला कायद्याच्या तरतुदीनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उद्या सकाळी १० वाजता जालन्यातील आपल्या मूळगावी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोर्टाचा हा निर्णय आल्याने मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जरांगेंचा इशारा
दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे झालेल्या सभेत जरांगेंनी, मराठ्यांनी मुंबईत येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही. ही मराठा समाजाच्या आरक्षणाची ‘शेवटची’ लढाई असल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जाहीर केले. मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीने सरकार हादरले पाहिजे. मुंबईत पोहोचल्यानंतर सरकारवर खरा दबाव येईल. लढाई आता मुंबईत होणार आहे. मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचे नाही. यापुढे भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, असा इशारा त्यांनी दिला.
कसा असणार जरांगेंचा मार्ग?
२७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करून २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा निर्णय त्यांनी जाहीर केला असून, शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही त्यांची मागणी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारने आधी मान्य केले होते. पण आता आरक्षण दिले जात नाही. हैदराबाद आणि साताऱ्याचे गॅझेट लागू करावे, त्यातील ५८ लाख नोंदी सापडल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही, त्याची अंमलबजावणी करावी, अशी जरांगेंची मागणी आहे. आरक्षण न दिल्यास सरकार उलथून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जरांगे २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणेमार्गे पुढे लोणावळा, वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहेत. "मुंबईत शांततेत जायचे आणि शांततेत आरक्षण घ्यायचे. सरकारने आपल्या मोर्चात काही दगडफेक करणारी माणसे पाठवली आहेत. पण आपण त्यांचा हेतू साध्य करू द्यायचा नाही, असे त्यांनी सांगितले.