
मुंबई / नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणातणी असताना स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील चार मंत्री सोडून जळगावच्या गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा एक निर्णय सरकारबाबतची नाराजी अधोरेखित करून गेला आहे. भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यास तब्ब्येतीच्या कारणावरून नकार दिल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच ती जबाबदारी आता मंत्री मंगलप्रभात लोढा पार पडणार आहेत.
गेल्या जानेवारी महिन्यात राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र यावर शिंदे सेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. म्हणूनच लगोलग महाजन यांच्या पालकमंत्री पदावर फुली मारण्यात आली आणि आजदेखील नाशिक या पदाच्या प्रतीक्षेत आहे.
स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे ध्वजारोहणाची संधी स्थानिक चार मंत्री वगळून महाजन यांना देण्यात आली. म्हणूनच नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा आहे. मंत्री छगन भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. तथापि, त्यांनी प्रकृतीच्या कारणावरून नकार दिल्याने आता त्यांच्या ऐवजी आता मंत्री मंगलप्रभात लोढा हे गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करणार असल्याचे शासनाकडून नव्याने जारी परिपत्रकात म्हटले आहे.