
भिवंडी/मुंबई : या देशामध्ये महिमामंडन (उदात्तीकरण) होईल ते फक्त छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे, औरंगजेबाच्या कबरीचे नव्हे. पुरातत्त्व विभागाने ५० वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षित स्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. हे आमचे दुर्दैव आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले, त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागत आहे. पण काहीही झाले तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही, असे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर देत आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने (तिथीनुसार) भिवंडी-वाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातील पहिल्या मंदिराचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. संगमेश्वर येथे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली, तो संगमेश्वरचा वाडाही सरकार विकासासाठी घेणार आहे. सरकार तिथे स्मारक बांधेल. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात ज्या ठिकाणी औरंगजेबाने कैद केले होते, ती जागाही स्मारक विकसित करण्यासाठी देण्यात यावी यासाठी सरकारने उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे. यासंबंधी अर्थसंकल्पातही योग्य ती तरतूद केली आहे.”
“पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्यानंतर १० वर्षांनी महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर आपला झेंडा रोवला होता. त्यामुळे सरकार पानिपत येथेही स्मारक बांधणार आहे. हे सरकार शिवाजी महाराजांच्या या मंदिराला तत्काळ तीर्थस्थळाचा दर्जा देईल. शिवाजी महाराजांचे मंदिर कशासाठी? ते यासाठी की, आज आपण आपल्या ईष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन साधना करू शकतो, याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देव, देश, धर्माची लढाई जिंकली म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. जसे हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचे दर्शन पूर्ण होत नाही. तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन आपल्याला फळणार नाही,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
“अठरापगड जातीच्या लोकांनी अटकेपार झेंडे रोवत शौर्य दाखवले. हेच शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला देणे म्हणून दिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे आपले दैवत आहेत. प्रभू श्रीराम रामांनी लोकांना सोबत घेऊन रावणाचे पतन केले. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनीदेखील केले आणि मोघलांना पराभूत केले. देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती जगले त्याचप्रमाणे आपण या छत्रपतींच्या मंदिरात जाताना मनात विचार आणून जावे,” अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
कबरीजवळ तगडा बंदोबस्त
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विहिंपने औरंगजेबाची कबर हटवा, अशी मोहीम सुरू केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांनी खुलताबाद येथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. कबरीच्या परिसरात असलेल्या दर्गा परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सोबतच लोखंडी बॅरिगेटिंग टाकण्यात आले आहेत. खुलताबाद आणि औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी - सुनील देवधर
महाराष्ट्रात देवाभाऊंचे कायद्याचे राज्य आहे, जे काही होईल ते कायद्यानेच होईल. औरंगजेबाच्या कबरीला उखडून टाकावे, अशीच माझी देखील भूमिका आहे. मात्र, जर या कबरीला हटविण्यात येत नसेल तर औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा. औरंगजेबाची कबर उखडलीच पाहिजे, पण ते कायद्याने होत नसेल तर हा पर्याय मी सुचवला आहे, असे भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी सांगितले.
आताच कबर दिसली का? - संजय जाधव
सरकारला आजच औरंगजेबाची कबर दिसली का? तुम्हाला समाजा-समाजामध्ये भांडणे लावून तुमची पोळी भाजायचीय का? जिथे घरोघरी चुलीऐवजी घरे पेटतील, असे कोणतेही काम शासनाने करू नये, असे आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केले.
नागपुरात दोन गटांत दगडफेक
नागपूर : नागपुरात दोन धार्मिक गटांत संघर्ष पेटल्यामुळे महालमध्ये तणाव निर्माण झाला. एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. यात पोलीस उपायुक्तांसह चारजण जखमी झाले आहेत. संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला होता. या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली. दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. जमावाने एका क्रेनला आग लावली आहे. पोलिसांच्या दिशेने दगड आणि विटा भिरकावल्या जात आहेत. मात्र पोलीस जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
विहिंप, बजरंग दलचे आंदोलन
नांदेड : औरंगजेबची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कबर त्वरित हटविण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान काही काळ रास्तारोकोही करण्यात आला. विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत घोषणाबाजी केली. औरंगजेबची कबर हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी असून ती ऐतिहासिक अन्यायाचे प्रतीक असल्याचा आरोप करत ती त्वरित हटवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी ‘औरंगजेबच्या कबरीचा निषेध असो’, ‘हिंदू समाजाला न्याय मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणा दिल्या.