शक्य तिथे एकत्र लढणार! महायुतीची रणनीती ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संकेत

अवघ्या काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या असतानाच सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीससंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : अवघ्या काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या असतानाच सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुती एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शक्य आहे तिथे महायुती एकत्र लढेल, मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे संकेतही फडणवीस यांनी दिले.

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि निवडणूक समितीला आहेत. इतर कोणालाही नाही. आमची भूमिका महायुतीने एकत्र निवडणूक लढवण्याची आहे. काही ठिकाणी शक्य नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते,” असे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोला येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले की, “आमची भूमिका पक्की आहे, महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत. मुंबई लोकलसंदर्भात केंद्राची बैठक होणार आहे. या बैठकीत नक्की चांगले निर्णय होतील. ज्यादिवशी अपघात झाला, त्यादिवशी माझे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे बोलणे झाले होते. लवकरच मुंबईच्या लोकल प्रश्नासंदर्भात तोडगा काढण्यात येईल.”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास तीन वर्षांपासून रखडल्या असून मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयानेच राज्याच्या निवडणूक आयोगाला चार आठवड्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. राज्य निवडणूक आयोगाने चार महिन्यांत निवडणुका पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असेही निर्देश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने दिले होते. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी २९ महानगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या २९ महानगरपालिकांमध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण-डोंबिवली यांचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती - बावनकुळे

राज्यातील सर्व निवडणुका आम्ही एकत्र महायुती म्हणून लढणार आहोत. याबाबतचे आदेश आम्ही पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. आमचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते एकमेकांशी याबाबत चर्चा करत आहेत. मात्र, जर एखाद्या ठिकाणी एखाद्या जागेवरून वाद निर्माण झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र, इतर ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका लढल्या जातील, त्यामुळे संभ्रम बाळगण्याची गरज नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुका महायुतीत लढणार – प्रफुल्ल पटेल

‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहोत. शक्य असेल तिथे युती केली जाईल. मात्र, शक्य नसेल तिथे आम्ही आपल्या ताकदीवर लढू. यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. तसे आदेश आम्ही दिले आहेत,” असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in