उद्धव-राज एकत्र येणार? आमच्यातील वाद, भांडण महाराष्ट्र हितासाठी किरकोळ : राज; महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला तयार : उद्धव

मराठीच्या मुद्द्यावर एकमत असलेले, पण एकमेकांपासून दूर असलेले ठाकरे बंधू कधी एकत्र येणार, अशी उत्सुकता राज्यातील तमाम शिव आणि मनसैनिकांना लागून राहिली आहे. अनेकदा टाळी देण्याचे प्रयत्न झाले, पण हे बंधू एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. पण सध्या स्वत:च्याच अस्तित्वासाठी लढणाऱ्या उद्धव आणि राज ठाकरे यांनी आता मात्र एकमेकांना पुन्हा एकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्धव-राज एकत्र येणार? आमच्यातील वाद, भांडण महाराष्ट्र हितासाठी किरकोळ : राज; महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला तयार : उद्धव
Published on

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर एकमत असलेले, पण एकमेकांपासून दूर असलेले ठाकरे बंधू कधी एकत्र येणार, अशी उत्सुकता राज्यातील तमाम शिव आणि मनसैनिकांना लागून राहिली आहे. अनेकदा टाळी देण्याचे प्रयत्न झाले, पण हे बंधू एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. पण सध्या स्वत:च्याच अस्तित्वासाठी लढणाऱ्या उद्धव आणि राज ठाकरे यांनी आता मात्र एकमेकांना पुन्हा एकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा वेगळे वळण घेण्याची शक्यता असून ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता दुणावली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा थेट सवाल विचारताच राज ठाकरे म्हणाले की, “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही. सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, हे माझे म्हणणे आहे.”

त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र हितासाठी किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची माझीही तयारी असल्याचे सांगत त्यांनीही युतीसाठी एक हात पुढे केला आहे. भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी माझीसुद्धा आपसातील किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची तयारी आहे. पण माझी अट एक आहे. महाराष्ट्राच्या हिताआड जो कुणी येईल, त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, मी त्याच्या घरी जाणार नाही हे प्रथम ठरवा. त्यानंतर महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यात माझ्याकडून कोणतीही भांडणे नव्हतीच. होती, तर मी आजच ती मिटवून टाकली. सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी ठरवायचे की, भाजपसोबत जायचे की शिवसेनेसोबत म्हणजे माझ्यासोबत... एसंशि नाही. गद्दारसेना नाही. त्यानंतर कुणासोबत गेल्यानंतर महाराष्ट्राचे, मराठी व हिंदुत्वाचे हित होणार हे ठरवा.”

“मी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्या माणसाच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावे. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही,” असे म्हणतही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत.

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही भाऊ आहेत, ही रक्ताची नाती आहेत. राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, मुंबई आणि मराठी माणसांसाठी एकत्र यावंच लागेल. मार्ग वेगळे झाले असले तरी उद्धव ठाकरेंचा मार्ग महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. राज ठाकरेंचे वक्तव्य मी आणि उद्धवजींनी ऐकले. महाराष्ट्र हितासाठी मी वाद मिटवायला तयार आहे,” अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मनोमिलनासाठी तयार असल्याचे सांगितले.

“राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मन की बात सांगितली. त्याबाबत आम्ही सकारात्मक असून सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहोत. ज्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचे आहे, अशा वेळेला दोन्ही ठाकरेंनी साद- प्रतिसाद अशी भूमिका घेतली आहे. अखेर हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. त्याच प्रवाहातले आम्हीदेखील कार्यकर्ते आहोत. अमित शहा यांनी शिवसेना तोडली, तिचे दोन तुकडे केलेत आणि तेच अमित शहा आता दुसरा पक्ष चालवत आहेत. हे विंचू आहेत, उद्या तुम्हालादेखील डंख मारतील,” असा इशारा संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना दिला.

उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे (डावीकडून उजवीकडे) यांचे जुने छायाचित्र.
उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे (डावीकडून उजवीकडे) यांचे जुने छायाचित्र. संग्रहित छायाचित्र

हा दिवस बघण्यासाठी बाळासाहेब हयात हवे होते - सुप्रिया सुळे

राज ठाकरे म्हणाले की, आमच्या वादापेक्षा महाराष्ट्रातले वाद मोठे आहेत. ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक, इतिहासातला सोनेरी दिवस आहे. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण मोठ्या मनाने त्यांचे स्वागत केले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एकत्र येत असतील तर स्वागतच - हर्षवर्धन सपकाळ

उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. भाजप व महायुती महाराष्ट्राच्या मुळावर उठली आहे. भाजप मात्र महाराष्ट्राची भाषा व संस्कृती तोडण्याचे काम करत आहे. याला राज ठाकरे यांच्या विचारातून दुजोरा मिळत आहे. 'आम्ही भारत जोडो'वाले आहोत, कुटुंब फोडणारे नाही. दोन परिवार एकत्र येत असतील तर आक्षेप घेण्याची गरज नाही. ठाकरे कुटुंब जोडले जात असेल तर स्वागतच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच - फडणवीस

दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असेल तर यामध्ये काहीही वाईट वाटण्याचं कारण नाही. ऑफर देणारे हे, त्यानंतर त्यावर प्रतिसाद देणारे आणि अटी ठेवणारेही तेच. त्यावर मी काय बोलणार? त्यामुळे याबाबत मला जास्त विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा - अजित पवार

“मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वत: काम करतात. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे काम करतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पक्षांबाबत काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही यावं? हे आम्ही दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाने सांगण्याचे काही कारण नाही. प्रत्येकाने आपल्या सद्सद‌्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटतं, तो निर्णय त्यांनी घ्यावा,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

एकनाथ शिंदे संतापले

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. यावर एकनाथ शिंदे चांगलेच भडकले. “तू कामाचं बोल. तुम्हाला दुसरं काही दिसतच नाही. राजकारण आहे की रोजचंच,” अशा शब्दांत शिंदेंनी आपला संताप व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in