आघाडीची गरज नाही! संजय राऊत यांच्या वक्तव्याने मविआत अस्वस्थता

इंडिया आघाडी लोकसभेसाठी बनली होती, तर महाविकास आघाडी विधानसभेसाठी बनली होती. या दोघांची आवश्यकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नसल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मुंबई : इंडिया आघाडी लोकसभेसाठी बनली होती, तर महाविकास आघाडी विधानसभेसाठी बनली होती. या दोघांची आवश्यकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नसल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे.

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक विषय असतात. काही शहरांचे विषय असतात, स्थानिक मुद्दे असतात. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निर्णयावर विचार करावा लागेल. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढवाव्यात यासाठी लोकांचा प्रचंड दबाव असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

शिवसेना व मनसेंनी एकत्र निवडणुका लढवाव्यात, अशी लोकांची इच्छा आहे. मात्र, निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेऊ, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

राज-उद्धव यांना एकत्र निवडणुका लढवाव्या लागतील!

मनसे आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार आहेत, असे मी म्हणालो नाही. मात्र, त्यासाठी लोकांचा दबाव असल्याचे मी म्हणालो होतो. शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन, एकत्र निवडणूक लढवावी यासाठी लोकांचा प्रचंड दबाव आहे. पाच तारखेला विजयी मेळावा झाला, त्या मेळाव्यात देखील ते दिसून आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जर मुंबईमध्ये मराठी माणसांना वाचवायचे असेल, मुंबईला वाचवायचे असेल, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊन निवडणुका लढवाव्या लागतील, अशी लोकांची मानसिकता असल्याचा दावा त्यांनी केला.

काँग्रेसची स्वबळाची तयारी - नाना पटोले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्ष स्वबळावर तयारी करत असतात. तशी काँग्रेस पक्षाची देखील तयारी असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले. इतकेच नाही तर महाविकास आघाडीमध्ये नवीन घटक पक्ष म्हणून मनसेला घेण्यासंदर्भात हाय कमांड निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in