अजित पवारांवर शिंदेंचे मंत्री नाराज; 'सह्याद्री'वरील आढावा बैठकीत मंत्र्यांची स्पष्टोक्ती

महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत गेले काही दिवस मिळत आहेत. सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांनी प्रत्येक मंत्र्याशी ‘वन टू वन’ चर्चा करत त्यांच्या खात्यांचा आढावा घेतला. यावेळी अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी नाराजी...
अजित पवारांवर शिंदेंचे मंत्री नाराज; 'सह्याद्री'वरील आढावा बैठकीत मंत्र्यांची स्पष्टोक्ती
Published on

मुंबई : महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत गेले काही दिवस मिळत आहेत. सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांनी प्रत्येक मंत्र्याशी ‘वन टू वन’ चर्चा करत त्यांच्या खात्यांचा आढावा घेतला. यावेळी अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात शिवसेना मंत्र्यांसोबत स्वतंत्र आढावा बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांनी प्रत्येक खात्याची सविस्तर माहिती घेतली. तसेच खात्याचे काम किती झाले आहे, किती बाकी आहे, निधीची अडचण आहे का, भविष्यात कोणती महत्त्वाची कामे हाती घेणार आहात, या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. शिंदे यांनी मंत्र्यांना लोकोपयोगी कामांवर भर देण्याचा, फाइल्स प्रलंबित न ठेवण्याचा आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा सल्ला यावेळी आपल्या मंत्र्यांना दिला.

अजित पवार अर्थमंत्री आहेत, जर आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही काम कसे करणार? असा प्रश्न यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपस्थित केला. सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवा, असे म्हणत सर्वांनी अजित पवारांबाबत नाराजीचा सूर प्रकट केला. यावर एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आश्वास्त केले की, मी स्वतः अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि यातून मार्ग काढेन.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या खात्याचा ७४६ कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळता केल्याच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका केली होती. समाजकल्याण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील ७४६ कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला होता.

अजित पवार विकासकामांत अडथळे आणतात !

या बैठकीत अजित पवार यांच्याबाबत तीव्र नाराजीचा सूर उमटला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेंना स्पष्टपणे सांगितले की, अजित पवार आमच्या विकासकामांमध्ये अडथळे आणत आहेत, निधी मिळण्यातही सापत्नभाव दाखवला जात आहे. तसेच आपल्या काही खात्यांचा निधी अन्यत्र वळवला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in