
नाशिक : शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी बैठकीत सोमवारी जोरदार राडा पाहायला मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पूर्ण झाल्यानंतर पक्षातील दोन गटांमध्ये वाद विकोपाला गेला आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गेली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप झाल्यानंतर वादाला तोंड फुटले.
प्राप्त माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी बैठकीचे हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी मंत्री उदय सामंत, दादा भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे आदी उपस्थित होते. अहिल्यानगरचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि बाबू शेठ यांच्यात राडा झाल्याची माहिती आहे. बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आल्याने वाद झाला. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ केली. घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद शांत केला. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला बाहेर नेले. हा पदाधिकारी बैठकीत कसा आला , याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, या घटनेची शहरभर जोरदार चर्चा आहे.
"ज्या व्यक्तीच्या समर्थकांनी हे कृत्य केले, त्याची दखल घेतली आहे. पक्षाकडून त्यांची गय केली जाणार नाही. या घटनेचा आढावा पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदे यांना देण्यात येईल. किरकोळ वाद आहे, गैरसमजामधून हे झालं आहे. स्वतःच्या प्रसिद्धसाठी त्यांनी बैठकीतील सांगणे हे उचित नाही. आम्ही त्यांना समज दिली आहे. ही बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी होती. आम्ही भिंग घेऊन इतर लोकांना शोधून काढू." - उदय सामंत, मंत्री, महाराष्ट्र राज्य