
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर आले असताना त्यांच्यासाठी आपल्या निवासस्थानी भोजनाचे आयोजन केले होते. मात्र शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी या स्नेहभोजनाकडे पाठ फिरवली असली तरी महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांसाठी महायुतीमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
शहा यांच्या भोजनाच्या निमित्ताने तटकरे यांनी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले असले तरी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मात्र रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे ठामपणे सांगितले. तटकरे यांची कन्या आदिती ही रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी उत्सुक असली तरी शिंदे गटाचे भरत गोगावले यांनीही त्यासाठी दंड थोपटले आहेत.
स्नेहभोजनानंतर तटकरे म्हणाले की, "या दौऱ्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पालकमंत्रीपदाचा मुद्दा हा या चर्चेचा भाग नव्हता. जेवणात फक्त महाराष्ट्रीयन बेत होता. या भोजनासाठी मी शिवसेनेच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले होते. पण ते या भोजनासाठी का आले नाहीत, मला त्याची कल्पना नाही. अमित शहा हे देशातील मोठे नेते असून त्यांच्याशी चर्चा करताना अनेक गोष्टींचे आकलन होते."
छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम आटोपल्यानंतर तटकरे यांच्या रायगडमधील सुतारवाडीयेथील गीताबाग निवासस्थानी सर्व नेते एकाच गाडीतून गेले होते. त्यात तटकरे यांच्यासह अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. त्याचबरोबर शिवेंद्रसिंह भोसले, आशीष शेलार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती.
छत्रपतींचे विचार जगभर पोहोचवा !
शिवचरित्र हे देशातील प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचवायला हवे. शिवरायांना महाराष्ट्रापर्यंत सिमित ठेवू नका. देशासह जगभरात शिवराय पोहोचवायला हवे. स्वभाषा, स्वधर्म, स्वराष्ट्राचे रक्षण त्यांनी केले तसेच गुलामिकतेची मानसिकता त्यांनी तोडली. छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना केवळ जन्म दिला नाही, तर स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्वातंत्र्याचा विचार दिला. त्यामुळेच शिवरायांनी महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्यात रूपांतर करून स्वराज्याचे स्वप्न साकार केले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तेव्हा संपूर्ण देश अंधारात होता. स्वराज्याबद्दल विचार करणे कोणालाही कठीण होते. एका १२ वर्षांच्या मुलाने जिजाबाईंकडून प्रेरणा घेतली आणि सिंधूपासून कन्याकुमारीपर्यंत भगवे राज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. छत्रपती शिवाजींनी जिजाऊंच्या संस्कारांना वटवृक्ष बनवले आणि शिवाजी महाराजानंतर जोपर्यंत औरंगजेब जिवंत होता, तोपर्यंत संभाजी महाराज, महाराणी लक्ष्मीबाई, धनोजी संतोजी लढत राहिले. स्वतःला आलमगीर (औरंगजेब) म्हणवणारा महाराष्ट्रात पराभूत झाला आणि त्याची कबर येथे बांधण्यात आली. भारतातील प्रत्येक मुलाला हे शिवचरित्र शिकवणे ही आपली जबाबदारी आहे."
"छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ना नशीब होते, ना भूतकाळ, ना पैसा, ना सैन्य. पण एका छोट्या मुलाने आपल्या अदम्य धैर्याने आणि दृढनिश्चयाने संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. २०० वर्षांपासून चालत आलेले मुघल राज्य त्यांनी उद्ध्वस्त केले आणि देश स्वतंत्र झाला. आज, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर, आपण जगासमोर डोके उंच करून उभे आहोत. आपण संकल्प करतो की जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करू तेव्हा आपला भारत जगात पहिल्या क्रमांकावर असेल. त्याची मूळ कल्पना शिवाजी महाराजांनी मांडली होती," असेही अमित शहा यांनी सांगितले.