प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

जमीन ‘सातबारा’च्या धर्तीवर स्वतंत्र ओळख आणि फ्लॅटधारकांना कायदेशीर हक्क देणारे ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केली.
प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव
प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : जमीन ‘सातबारा’च्या धर्तीवर स्वतंत्र ओळख आणि फ्लॅटधारकांना कायदेशीर हक्क देणारे ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केली. या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे ७ कोटी फ्लॅटधारकांना दिलासा मिळणार आहे.

इमारतीतील प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मांडला आहे. या कार्डमध्ये फ्लॅटची मालकी, क्षेत्रफळ, संबंधित हक्क, गहाण कर्ज आणि अन्य दायित्वांची माहिती नोंदवली जाणार आहे. मालमत्ता व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि मालकी हक्कांवरील वाद कमी करणे हा या प्रस्तावाचा उद्देश आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “प्रस्तावित ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणालीअंतर्गत प्रत्येक पात्र निवासी किंवा अन्य युनिटसाठी स्वतंत्र पूरक अधिकार अभिलेख तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत विद्यमान जमीन अभिलेखांसोबत हे नोंदीपत्र ठेवले जाईल.”

यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र जमीन महसूल (इमारतीतील युनिट्सच्या अधिकार अभिलेख व नोंदवह्यांची तयारी आणि देखभाल) नियम, २०२६’ प्रस्तावित केले आहेत. इमारतीसाठी प्रथम मुख्य प्रॉपर्टी रेकॉर्ड तयार केला जाईल. त्यानंतर प्रत्येक फ्लॅट किंवा युनिटसाठी स्वतंत्र नोंद तयार करून विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाणार आहे.

या नोंदीमध्ये फ्लॅट क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, संबंधित हक्क आणि दायित्वांचा तपशील असेल. इमारतीचे मंजूर क्षेत्र, सामायिक जागा, खुल्या जागा तसेच रस्त्याखालील क्षेत्र यांचीही नोंद करण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागांसाठी वेगवेगळे नमुने प्रस्तावित करण्यात आले आहेत. शहरी भूमापन क्षेत्रात इमारतीसाठी ‘डी-१’ आणि स्वतंत्र फ्लॅटसाठी ‘डी-२’ नमुना वापरला जाईल. ग्रामीण व अन्य क्षेत्रांमध्ये गाव नमुना ७-क आणि ७-ड यांच्याशी संबंधित ‘आय-ए’ आणि ‘आय-बी’ नमुने प्रस्तावित आहेत.

प्रॉपर्टी कार्डमधील नोंदी मंजूर बांधकाम आराखडे, संबंधित प्रमाणपत्रे आणि नोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे केल्या जातील. नवीन प्रकल्पांसाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने दिलेले प्रारंभ प्रमाणपत्र आधारभूत असेल. जुन्या इमारतींसाठी भोगवटा प्रमाणपत्र आणि नोंदणीकृत दस्तऐवज आवश्यक असतील.

इमारत पाडणे, पुनर्विकास किंवा पुनर्बांधणीच्या प्रकरणांमध्ये जुन्या नोंदी बंद अथवा अद्ययावत करून नवीन मंजूर आराखड्याच्या आधारे नव्या नोंदी तयार केल्या जातील.

या प्रस्तावित व्यवस्थेसाठी सहकारी संस्था, अपार्टमेंट मालकी, महापालिका आणि नगररचना संबंधित कायदे व नियमांमध्ये आवश्यक बदलही करण्यात येणार आहेत. समन्वयासाठी आंतरविभागीय समिती आणि आयुक्त स्तरावरील सक्षम कार्यालय प्रस्तावित आहे.

मसुदा नियम ३० दिवसांसाठी प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राप्त प्रतिक्रियांचा विचार करून नियम अंतिम केले जातील. प्रायोगिक अंमलबजावणीनंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात ही प्रणाली लागू करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

या उपक्रमामुळे मालमत्तेची खरेदी-विक्री, बँक कर्ज मिळवणे सुलभ होण्याबरोबरच मालकी हक्कांची स्पष्टता वाढेल, दायित्वांची माहिती उपलब्ध होईल, मालमत्तेसंबंधी वाद आणि फसवणूक कमी होईल, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.

डिजिटल कार्ड आणि सर्व विभागांचे एकत्रिकरण

ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून, मंजुरीनंतर फ्लॅटधारकांना एटीएम कार्डप्रमाणे खिशात ठेवता येईल असे ‘डिजिटल प्रॉपर्टी कार्ड’ मिळेल. यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभाग, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरणे (सिडको, नैना, पालिका, नगरपालिका), महारेरा, भूमी अभिलेख विभागांचे ‘एपीआय’ माध्यमातून एकत्रीकरण केले जाणार आहे. इमारतीचा पुनर्विकास झाल्यास नवीन आराखड्यानुसार नोंदी केल्या जातील.

व्यवहाराचे सुलभीकरण

फ्लॅटवर बँकेचे कर्ज, गहाणखत, मालमत्ता कर किंवा सोसायटीची थकबाकी, न्यायालयीन निर्बंध अथवा शासकीय देणी असल्यास त्याची थेट नोंद संबंधित प्रॉपर्टी कार्डवर होईल. बिल्डरचे कॉमन कर्ज मुख्य नोंदीवर तर वैयक्तिक कर्ज संबंधित सदनीकाधारकाच्या कार्डवर दिसेल. अधिकृत बांधकाम, मंजूर नकाशा आणि संबंधित कागदपत्रे असलेल्या प्रकल्पांनाच हे कार्ड मिळणार असून, अनधिकृत बांधकामांना यातून वगळण्यात आले आहे.

प्रॉपर्टी कार्डची वैशिष्ट्ये

  • प्रत्येक युनिटला स्वतंत्र ओळख क्रमांक

  • मालकाचे नाव, क्षेत्रफळ आणि मालकी हक्कांची नोंद

  • कर्ज, गहाणखत, थकबाकी आणि अन्य दायित्वांचा तपशील

  • इमारतीच्या सामायिक व खुल्या जागांची नोंद

  • डिजिटल स्वाक्षरीयुक्त कार्ड आणि ऑनलाइन प्रक्रिया

  • मसुदा नियमांवर ३० दिवस हरकती-सूचनांची मुदत

  • प्रायोगिक अंमलबजावणीनंतर राज्यभर टप्प्याटप्प्याने विस्तार

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)