राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन; फडणवीसांची टाळाटाळ; दिवाळीपूर्वी सर्व पूरग्रस्तांना मदत मिळेल - मुख्यमंत्री

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून लाखो हेक्टरवरील पिके पाण्यात बुडाली आहेत. राज्यभरातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना सरकारकडून याबाबत अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन; फडणवीसांची टाळाटाळ; दिवाळीपूर्वी सर्व पूरग्रस्तांना मदत मिळेल - मुख्यमंत्री
Published on

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांनी पावसाच्या पाण्यात नांगी टाकल्याने आता शेतकऱ्यांवर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकार या मागणीबाबत उदासीन असल्याचे दिसून येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेले काही दिवस शेतीच्या बांधावर न फिरकलेल्या मंत्र्यांना, नेत्यांना पंचनामे करण्यासाठी बाहेर पडा, असे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने बुधवारी महायुतीमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी लावली. मात्र, डोळ्यात अश्रू आणि सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली असता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती सरकारची उदासिनता दिसून आली.

जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सध्या अस्मानी संकटात सापडला आहे. पूरस्थितीमुळे शेतातील उभी पिके तसेच कष्टातून उभा केलेला संसार डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाला आहे. काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, मका, फळबागा आणि ऊस इत्यादी सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहेत. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी हेलिकॉप्टरमधून सोलापूर आणि धाराशीव जिल्ह्याचा दौरा करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. सोलापूरमधील निमगाव येथे मुख्यमंत्र्यांनी स्थानिक अधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी झालेल्या नुकसानीचा पाढाच मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पीडितांना योग्य ती मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.

संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी खुबीने टोलवून लावला. ते म्हणाले की, “ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतील टर्म आहे. पण पावसामुळे जे नुकसान झाले आहे, त्या सगळ्यांची भरपाई करण्याचा तसेच टंचाईच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो, त्या सगळ्या सवलती द्यायचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती देण्यात येतील.”

सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या कोर्टी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. त्यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर त्यांनी मौन साधले. “मीदेखील शेतकरी आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही शक्य होईल ते करेल, पण आम्हाला पाहणी करू द्या,” असे उत्तर अजित पवारांनी दिले.

मंत्री पंकजा मुंडे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ, कुंभार पिंपळगाव, चिंचोली आदी गावच्या शिवारात शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. जोरदार पावसामुळे कापूस, सोयाबीनसह सर्वच पिके मातीमोल झाली आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. राज ठाकरे म्हणतात की, “महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केले नसेल. कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. त्यामुळे कुठल्याही निकषांच्या चौकटी न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंज्या नुकसानभरपाईऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसानभरपाई घोषित करा.”

एक गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही - कृषिमंत्री

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम शंभर टक्के दिली जाईल. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुटपुंजी आहे, याविषयी दुमत नाही. मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल. राज्य सरकार एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसान झालेल्या एक गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही. आमचे अधिकारी प्रत्येक शेतात जाऊन पंचनामा करतील, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अहिल्यानगर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

मदतीच्या किटवर शिंदेंकडून प्रचार

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून धाराशीव जिल्ह्यात किटचे वाटप करण्यात येत होते. मात्र, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून गेलेल्या या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो असल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

काही अटी शिथील करू - एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवच्या परांडा तालुक्यातील करंजा वस्ती गावातील नुकसानीचा आढावा घेतला. “परांडा तालुक्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. विशेषतः घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचेही नुकसान झाले आहे. नदीकाठच्या गावांतील जमिनीही खरडून गेल्या आहेत. मी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात तब्बल ९८ हजार हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणे सरकारचे काम आहे. याप्रकरणी तातडीची मदत लवकरात लवकर केली जाईल. त्यानंतर पाणी पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करून योग्य ती मदत केली जाईल. काही अटी शिथील केल्या जातील,” असे शिंदे म्हणाले.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार एक महिन्याचा पगार देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. तसेच शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे तसेच आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. त्याचबरोबर पूरग्रस्तबाधित प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ वितरण करण्यास सुरुवात झाली असून आत्तापर्यंत २,६५४ कुटुंबांना मदत केली आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in