
मुंबई : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कुठल्या भागात शेतीचे, तर काही जिल्ह्यांत घरांचे प्रचंड नुकसान झाले. याचे तत्काळ पंचनामे करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणीसाठ्यासाठी, पीक परिस्थिती, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.
राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून तसेच पाण्यात बुडून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वय साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. ‘सचेत’ प्रणालीवरून १९ कोटी पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश मोबाइल तसेच लघु संदेशाद्वरे देण्यात येत आहेत. तसेच १९ कोटी २२ लाख मोबाइल, लघु संदेश पाठविण्यात आले. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएसने सुसज्ज करण्यात आले आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयातील जलसाठा ११ टीएमसीने वाढल्याची माहिती दिली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात टँकरच्या संख्येत काही अंशी घट झाली आहे. परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अजूनही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री निलेश राणे यांनी भाग घेतला.
आचार्य अत्रे चौक स्थानक अनिश्चित काळासाठी बंद
मेट्रो-३ च्या आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी घुसल्याने या स्थानकातील सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. या स्थानकातील विद्युत उपकरणे पूर्ववत करण्याचे आणि पावसाच्या पाण्यामुळे आलेला गाळ काढण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत या स्थानकातील मेट्रो सेवा काही दिवस बंद राहणार आहे. सध्या भुयारी मेट्रोची सेवा आरे जेव्हीएलआर ते वरळीदरम्यान चालवण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे मेट्रो स्थानकात पाणी घुसल्याने सोमवारपासून या स्थानकातील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे.
राज्याला मान्सून झोडपणार
महाराष्ट्रात येत्या ६-७ दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असून, महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीसदृश ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिमेला कमी मध्यम दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकण्याची आणि पुढील ४८ तासांत स्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. २७ ते ३० मे या काळात केरळमध्ये, २७ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्चिम घाटमाथा आणि पायथा परिसरात, कर्नाटकातील किनारपट्टी, घाटमाथ्यावर, त्याचबरोबर तमिळनाडूनतील घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.